जावयाने सासूकडून दहा लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याची घटना उजेडात आली आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी जावयाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीने तीन महिन्यापासून आपल्या आणि मेहुणीच्या मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. राखी आणण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय आणि दोन वर्षीय मुली घरी परतल्या नसल्याने स्वतः आरोपीने पोलीसात धाव घेऊन अपहरणाची तक्रार दिली होती. अखेर त्याचा हा कट पोलिसांनी काही तासात उघड केला आणि घरात डांबून ठेवलेल्या मुलींची सुखरूप सुटका झाली. ४५ वर्षीय आरोपी जावयाला पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी रक्षाबंधनाच्या दिवशी पंधरा आणि दोन वर्षीय अल्पवयीन मुली राखी घेण्यासाठी घराबाहेर पडल्या. काही तास उलटले तर त्या घरी परतल्याच नाहीत. बराच वेळ झाला मुली घरी परतल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांनी मुलींचा शोध घेतला. मात्र, त्या मिळून न आल्याने अखेर वाकड पोलिसात धाव घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्यांच गांभीर्य ओळखून तपास सुरू केला. काही तासांनी आरोपीने स्वतः च्या पत्नीच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या मुली सुखरूप हव्या असतील तर पोलिसांना काही न सांगता दहा लाख द्या. पैसे न दिल्यास मुलींचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. मग, स्वतःच पोलिसांसोबत मुलींचा शोध घेण्याचा बनाव केला. वाकड पोलिसांना आरोपीवर संशय आणि बोलण्यात विसंगती आढळत असल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने गुन्हा कबूल करत सासूकडे आलेले ३० ते ४० लाखांपैकी दहा लाख खंडणी हवी असल्याने स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण केल्याचं सांगितलं. मुलींना वाघोली येथील घरी डांबून ठेवलं होतं. अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

आणखी वाचा-संभाजी भिडे यांच्या पुण्यात होणार्‍या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार

तीन महिन्यांपूर्वी आरोपीने स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलीचे अपहरण करून सासूकडून पैसे उकळायचे असा कट रचला. त्यानुसार मेहुणीचा मोबाईल चोरला. तोच मोबाईल तीन महिन्यांनी म्हणजे अपहरणाच्या गुन्ह्यात वापरला. नातींचे अपहरण केल्याने आजी पैसे देईल या हेतूने अपहरण केले परंतु त्या अगोदरच पोलिसांनी जावई आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या टीमने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man kidnapp own and sister in laws daughter to extort 1 million ransom from mother in law kjp 91 mrj
Show comments