पिंपरी- चिंचवड : ५० हजार रुपयांमध्ये मुलगा विकत न दिल्याने त्याचे अपहरण केल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी अवघ्या काही तासातच अपहरणकर्त्याकडून आठ वर्षीय चिमुकल्याची सुटका करण्यात खंडणी विरोधी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाला यश आलं आहे. ३१ मार्च रोजी चिंचवडमधून ओळखीच्या व्यक्तीने आठ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केल्याची तक्रार चिंचवड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.
या प्रकरणी १ एप्रिल रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात महिलेने तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने अपहरणकर्त्या मुलाची सुखरूप सुटका करून आईच्या स्वाधीन केलं आहे. गजानन सुपडा पानपाटील असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन पानपाटील चार दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये ओळखीच्या व्यक्तीकडे आला होता. आरोपीने त्यांच्या आठ वर्षीय मुलासोबत चॉकलेट, बिस्किट देऊन जवळीक साधली. मुलगा आरोपीकडे जायचा. याच दरम्यान ओळखीच्या व्यक्तीच्या पत्नीला तुझा आठ वर्षाचा मुलगा पन्नास हजारांमध्ये विकत दे अशी मागणी केली. महिलेने मुलगा देण्यास नकार दिला. तरी देखील आरोपी आठ वर्षाच्या मुलासाठी हट्ट करत होता. ३१ मार्च रोजी पती- पत्नी कामाला गेल्यानंतर आठ वर्षीय मुलाचे आरोपी गजानन पानपाटीलने अपहरण करत थेट चाळीसगाव गाठलं.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी सूत्र हलवली. भुसावळ पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, चाळीसगाव पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून अपहरणकर्ता गजाननचे मुलासह सीसीटीव्ही फुटेज पाठवले. अखेर आरोपीला चाळीसगावमध्ये रेल्वेतून ताब्यात घेण्यात आले. रेल्वे सुरक्षा बल च्या मदतीने आरोपी पर्यंत पिंपरी- चिंचवड पोहचले. ५० हजार ते एक लाख रुपयांना आठ वर्षीय मुलगा विकत न दिल्याने गजानन पानपाटील याने अपहरण केल्याची कबूल पोलिसांना दिली आहे. गजानन पानपाटील याला दोन मुलं आहेत. त्यामुळे अपहरण करून घेऊन जाणारा मुलगा कुणाला द्यायचा होता. की, विक्री करायचा होता?. याबाबत पोलीस तपास करत आहेत.