नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने मित्राचा खून केल्याची घटना नारायणगाव परिसरात घडली. खून करून पसार झालेल्या एकास पोलिसांनी अटक केलीय.
संभाजी बबन गायकवाड (वय ४४) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गायकवाडचा मित्र पिंटू उर्फ रामदास तुकाराम पवार ( वय ४०, रा. वैष्णवधाम, ता. जुन्नर, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
गायकवाड आणि पवार मित्र आहेत. पवार मीना नदीच्या काठावर असलेल्या एका मंदिरात पुजारी होता. गायकवाड पवार याच्याकडे नेहमी यायचा. गायकवाडचे आपल्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध संशय पवारला होता. त्यानंतर पवारने गायकवाडवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला होता.
पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, नारायणगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे आणि तपास पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी पवारचा माग काढण्यास सुरूवात केली. पवार वरसावने गावाजवळ डोंगररांगात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर पवार पसार झाला. त्यानंतर तो घोडेगाव स्मशानभूमीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर पवारला पोलिसांनी ताब्यात घेतले.