दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई केतन उत्तम धेंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> थेऊर गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी योगेश आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोरमधील रायवाडी भागात असलेल्या दत्तात्रय कांबळे यांच्या खोलीत दारू पित होते. त्यावेळी आरोपी नंदू तेथे आला. त्याने योगेशला शिवीगाळ केली. दारू पिण्यास पैसे का दिले नाही, अशी विचारणा करुन त्याला धक्काबुक्की केली. झटापटीत त्याने योगेश यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोमनाथ जाधव याच्यासह चौघांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने दारु पिण्यास पैसे न दिल्याने योगेश याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन खून केल्याचे उघड झाले. आरोपी नंदू म्हात्रेला अट करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.