लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: घरगुती भांडणातून डोक्यात कुकर घालून पत्नीचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार खराडीतील थिटेवस्ती परिसरात उघडकीस आला. यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंधावणी राजेभाऊ पारखे (वय ५३, रा. खराडी) ही महिला या घटनेत मरण पावली. तिच्या खुनाच्या आरोपावरून पती राजेभाऊ किसान पारखे (वय ४२, रा. थिटे वस्ती, खराडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. पारखे दाम्पत्य मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी ते पुण्यात आले होते.
आणखी वाचा-घ्राणेंद्रियाच्या क्षमतेवर करोनामुळे परिणाम; आयसर पुणेतील शास्त्रज्ञांच्या संशोधनातील निष्कर्ष
राजेभाऊ टेम्पोचालक आहे. रंधावणी मोलमजुरी करत होती. उभयतांची १२ मार्च रोजी भांडणे झाली होती. त्यावेळी त्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात कुकर मारला. त्यात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथून उपचारानंतर २४ मार्च रोजी ती घरी आली. त्यानंतर पुन्हा तिला त्रास होऊ लागला. त्यातच तिचे २७ मार्च रोजी निधन झाले. त्याबाबतची माहिती समजल्यावर पोलिसांनी चौकशी केल्यावर खुनाचा प्रकार उघडकीस आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर याप्रकरणी तपास करीत आहेत.