शिरुर : नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याने महिलेचा खून करण्यात आल्याचा प्रकार शिरुरमधील गणेगाव खालसा येथे घडला. पती फरार झाला असून पोलीस तपास करत आहेत. मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७, रा. गणेगाव तालुका, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे हा फरार झाला आहे. मीनाबाईचा चुलत भाऊ ताराचंद सुकलाल मोरे (वय, २६ वर्षे, रा. सिदवाडी, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव येथील एका मोकळ्या जागेत मीनाबाई हिचा मृतदेह आढळून आला. मीनाबाई हिने नाशिक येथे नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे ज्ञानेश्वर याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो फरार झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे तपास करीत आहेत.