पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत तिघांची ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी हडपसर, विश्रांतवाडी, तसेच कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. शेअर बाजरात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. जास्त रक्कम गुंतविल्यास परतावाही चांगला मिळेल, असे आमिष दाखवून महिलेला जाळ्यात ओढले. महिलेने गेल्या पाच महिन्यात चोरट्यांनी दिलेल्या खात्यात वेळोवेळी २४ लाख १८ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने तक्रार नोंदविली. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

डॉक्टरांमुळे पुणे पालिकेला डोकेदुखी! अखेर उचलावे लागले कारवाईचे पाऊल; जाणून घ्या नेमका प्रकार…

विश्रांतवाडीतील एकाची चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४१ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत. हडपसर भागातील एका नागरिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी २५ लाख रुपयांची फसवणूक केली. तक्रारदार मांजरी भागात वास्तव्यास आहेत. चोरट्यांनी त्यांना गुंतवणुकीची आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे तपास करत आहेत.

कोट्यवधींची फसवणूक

वर्षभरापासून शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. चोरट्यांनी पुणे शहर, परिसरातील अनेकांची फसवणूक केली आहे. आतापर्यंत चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. आमिषांनी बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाकडे अनेक जण काणाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांच्या आमिषांनी बळी पडणारे उच्चशिक्षित असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.