पुणे: एक मनोरुग्ण बांग्लादेशी तरुण सीमा ओलांडून भारतात आला. सैरभैर अवस्थेत फिरत असताना त्याला एका स्वयंसेवी संस्थेने आसरा दिला. अखेर २१ वर्षांनी त्या तरुणाची पुन्हा मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. यामुळे एवढी वर्षे त्याचा शोध घेणाऱ्या कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला आहे.
एम. रहमान (वय ३६) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला स्मृतिभ्रंशाचा आजार आहे. तो २००२ मध्ये घरापासून भटकत दूर निघून आला. त्याच अवस्थेत तो सीमा ओलांडून भारतात आला. तो असाच भटकत असताना त्याला २०१९ मध्ये प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भारत वाटवानी यांच्या कर्जतमधील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनमध्ये आसरा मिळाला. करोना संकटाच्या काळातही तो याच केंद्रात होता. केंद्रातील डॉक्टरांनी त्या तरुणाकडून त्याची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा-रत्नागिरी, रायगडमध्ये दोन दिवस पावसाचे; पुणे, साताऱ्याच्या घाट परिसरात जोर वाढणार
केंद्रातील एक स्वयंसेवक बंगाली भाषा जाणणारे होते. त्यांनी बंगालीतून रहमानशी संवाद साधण्यास सुरुवात केली. अखेर काही महिन्यांनी हळूहळू रहमानने बोलण्यास सुरुवात केली. त्याच्या भाषेचे वळण पश्चिम बंगालच्या सीमा भागातील होते. अहमदनगरमधील स्नेहालय संस्थेने बांग्लादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका सायकल रॅलीचे आयोजन केले होते. मागील वर्षी १५ ऑगस्टला हा कार्यक्रम झाला. त्या वेळी बांग्लादेशमधील नौखालीतील गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक राहा नवकुमार दास उपस्थित होते. त्यांच्याशी रहमानबाबत संपर्क साधण्यात आला. त्या वेळी त्यांनी तो बांग्लादेशी असल्याचे सांगितले.
रहमानची ओळख पटविण्यासाठी अनेक जणांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क करण्यात आला. अनेक कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर अखेर रहमानचे वडील शाहिदूल इस्लाम यांनी व्हिडीओ कॉलमध्ये त्याला ओळखले. तो मानसिक आजारी असून, २००२ मध्ये बेपत्ता झाल्याचेही त्यांनी सांगितले. नंतर त्याला घेऊन केंद्राचे स्वयंसेवक पश्चिम बंगालला गेले. तिथून त्याला सीमापार त्याच्या घरी २१ जुलैला रवाना केले.
आणखी वाचा- खरीप पेरण्या ८९ टक्क्यांवर; जुलैमधील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
आतापर्यंत १० हजार जणांना मदत
श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशनने आतापर्यंत १० हजारहून अधिक जणांची त्यांच्या कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवून दिली आहे. या केंद्रात मनोरुग्णांना आश्रय दिला जातो. त्यांची काळजी घेऊन त्यांना पुन्हा कुटुंबीयांकडे पोहोचविण्याचे काम केले जाते.