लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र बेरोजगार परिषदेकडून कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने ३९ जणांची १५ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करुन पसार झालेल्या एकाला मुंबईतून पकडून कर्जदारांनी पुण्यात आणले. मुंबईतून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तसेच कर्ज मंजुरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
याबाबत लविना अमोदन मरियन (वय ४७, रा. आदर्शनगर सोसायटी, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शोधन भावे, आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, राजेश कानभास्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार महाराष्ट्र बेरोजगार परिषदेचे कार्यालयात नोव्हेंबर २०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोधन भावे आणि साथीदारांनी संगनमत करुन महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून शुल्क घेतले. कर्ज मंजूर न करतान ३९ जणांची १५ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसंनी दोन महिलांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार केकाण तपास करत आहेत.
दरम्यान, शोधन अनिल भावे (वय ५७, रा. करण क्लारिसा सोसायटी, वारजे) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ एप्रिल रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून कर्ज मंजूर करण्याचे शुल्क म्हणून १५ लाख ७८ हजार रुपये घेतले होते. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कर्जदारांनी भावेचा शोध घेतला. तो अंधेरीतील हॉटेल कलिंगात असल्याची माहिती कर्जदारांना मिळाली. त्यानंतर त्याला अंधेरीत कर्जदारांनी पकडून पुण्यात आणले, येरवड्यातील गुंजन चित्रपटगृह चौकात त्याला मारहाण करण्यात आली. भावे याचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके तपास करत आहेत.