मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यायचा असेल, तर तुम्ही काय कराल? धावण्याचा सराव, आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम असे पर्याय तुम्ही द्याल. मात्र, लंडनमध्ये राहणाऱ्या एका पुणेकराने मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी चक्क लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेला (बेरियाट्रिक सर्जरी) पसंती दिली. चार महिन्यांत ४० किलो वजन कमी करुन त्याने १० किलोमीटरची मॅरेथॉन पूर्णही केली.या ३८ वर्षीय व्यक्तीचे वजन १८० किलो होते. त्याने भारतात येऊन पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक मिनी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया केली. अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे बॅरिएट्रिक, हर्निया आणि ॲडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. केदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा >>>‘सावधान! नवले ब्रिज पुढे आहे’; सतत अपघात होणाऱ्या नवले ब्रिजवर लागले अनोखे बॅनर
या व्यक्तीचे वजन वाढल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता. आहार नियंत्रण आणि व्यायाम करूनही त्याचे वजन नियंत्रणात येत नव्हते. अनेक सहव्याधींनी त्याला ग्रासले होते. लंडनमधील डॉक्टरांनी त्याला लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला होता. मात्र, मूळचा पुणेकर असल्यामुळे इथे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय त्याने घेतला.
हेही वाचा >>>पुणे: दुर्मीळ मेंदुविकाराने ग्रासलेली १९ वर्षीय तरुणी शस्त्रक्रियेद्वारे अपस्मारमुक्त
याबाबत डॉ. केदार पाटील म्हणाले, या व्यक्तीला गंभीर मधुमेहासह अनेक सहव्याधी होत्या. सर्वच तपासण्यांमधून त्याला सुपर ओबेसिटी (अति लठ्ठ) असल्याचे स्पष्ट होते. त्याची साखर आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याची गरज होती. त्या दृष्टीने आवश्यक बदल आणि औषधोपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी त्याला घरी सोडण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या चार महिन्यांत त्याचे वजन ४० किलो कमी झाले. येत्या ११ महिन्यांत ते आणखी ४० ते ५० किलो कमी होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याने लंडनमधील एका मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन १० किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.