भांडणे सोडविल्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी गणेश भारतीनाथ सदभैय्या, नितेश सुनील सदभैय्या, शुभम जयवंत बावरी ( तिघे रा. कतारवाडी, येरवडा) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबू सदभैय्या (वय ३५, रा. कतारवाडी, येरवडा) याने या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे : भाजप शहराध्यक्ष बदला, अन्यथा निवडणूक जिंकणे अवघड;भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांची मागणी
फिर्यादी विशाल यांच्या घराशेजारी आरोपी राहायला आहेत. आरोपी त्याचे नातेवाईक आहेत. आरोपी गणेश याचे वडील भारतीनाथ यांचा महेंद्र बावरी यांच्याशी वाद झाला होता. त्या वेळी विशालने भांडणात मध्यस्थी केली होती. मध्यस्थी केल्याने आरोपी विशाल याच्यावर चिडले होते. आरोपी विशाल याच्या घरात शिरले. ‘तुझ्यामुळे आमच्या वडिलांना मान खाली घालावी लागली,’ असे आरोपी म्हणाले. त्यांनी विशालवर कोयत्याने वार केले. विशालची पत्नी आणि आईने भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयता उगारुन दहशत माजविली. आरोपी नितेशने दोघींना मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.