लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : महिलांच्या गळ्यातील हिसकावलेले दागिने विकण्यासाठी सासुसोबत आलेल्या सराईत इराणी चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केले. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले.

सादिक शमल खान इराणी (वय ३४, रा. श्रीरामपूर, जि. नगर), नर्गिस जाफर इराणी (वय ४५, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निर्जनस्थळावरून पायी जाणार्‍या महिलांची रेकी करून तोंडाला मास्क, हेल्मेट घालून नंबर नसलेल्या दुचाकीवरून येणारे चोरटे दागिने हिसकावून पळून जात होते. अशा घटना घडलेल्या ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासून गुन्हे शाखा युनिट दोनने तपास सुरु केला.

आणखी वाचा-कौटुंबिक वादातून दोन महिलांचा खुनाचा प्रयत्न; सहकारनगर, कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोनसाखळी चोरणारा सादिक निगडी परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाहतूकनगरीतून सादिक आणि त्याच्या सासूला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. सादिक सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्याकडून १२ तोळे वजनाचे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. त्याच्यावर सोनसाखळी चोरी, बतावणी करून फसवणूक आणि इतर असे १९ गुन्हे दाखल आहेत.

सादिक हा नगर येथे राहतो. तो चोरी करण्यासाठी पुणे, पिंपरी – चिंचवड शहरात येत असे. त्याच्या एका मित्रासोबत मिळून तो चोर्‍या करत होता. चोरलेले दागिने विक्रीसाठी सासू नर्गिस हिच्याकडे देत होते, ती दागिने विकायची. सादिक हा त्याच्या सासूला घेऊन निगडी परिसरात चोरीचे दागिने विक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्याला अडवले आणि त्याचे बिंग फुटले.

Story img Loader