पुणे : पोलीस असल्याच्या बतावणीने महिलेचे सहा लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव बुद्रुक परिसरातील एका मंगल कार्यालयात आल्या होत्या.
विवाह समारंभ आटोपून त्या दुपारी तीनच्या सुमारास मंगल कार्यालयातून बाहेर पडल्या. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्याने खाकी रंगाची पँट परिधान केली होती. त्यांनी महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात महिलांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर महिलेने पिशवीत दागिने ठेवली. पिशवीत दागिने ठेवले का नाही, याची तपासणी करण्याचा बहाणा करुन चोरट्यांनी महिलेच्या नकळत दागिने काढून घेतले. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करत आहेत.