लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मुलीच्या नावावर जमीन करून देण्यासाठी सासरे आणि नातेवाईकांनी येरवड्यातून जावयाचे अपहरण करुन बीडला नेले. तेथे जावयाला मारहाण करून गोठ्यात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सासऱ्यासह सात ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी सासरे प्रकाश गेमा राठोड, रमेश गेमा राठोड (रा. पिंपळा गेवराई, जि. बीड) यांच्यासह सात ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २५ वर्षीय जावयाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावय मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. कामासाठी तो पुण्यातील येरवडा भागात वास्तव्यास आहे. फिर्यादी तरुणाने पत्नीच्या नावावर जमीन करावी, अशी मागणी सासऱ्यांनी केली होती. तरुणाने सासऱ्यांना नकार दिला. त्यानंतर सासरा आणि नातेवाईकांनी जावयाचे येरवडा भागातून ४ सप्टेंबर रोजी अपहरण केली.
आणखी वाचा-कोपर्डी प्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या, गळफास घेऊन संपवलं जीवन
जावयाला बीडमधील पिंपळा गेवराई गावात नेण्यात आले. मुलीच्या नावावर जमीन कर. अन्यथा तुला जीवे मारू, अशी धमकी सासऱ्यांनी त्याला दिले. त्याचे हातपाय दोरीने बांधून गोठ्यात डांबून ठेवले. ६ सप्टेंबर रोजी जावयाची सुटका करण्यात आली. त्यानंतर तो पुण्यात आला. त्याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.