पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. आंदेकर यांचा खून वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून झाल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात आंदेकर यांची बहीण संजीवनी, कोमकर, मेहुणे जयंत, प्रकाश, गणेश, तसेच गुंड सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते मुख्य सूत्रधार आहेत. गेल्या वर्षी गायकवाडचा मित्र निखिल आखाडेचा आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आंदेकर यांचा बहीण संजीवनीशी वाद झाला होता. वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून आरोपींनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून पिस्तुले, कोयते, महागडी मोटार, दुचाकी जप्त करण्यात आली होती. आरोपींना एनडीए रस्त्यावरील गुंड अभिषेक खोंड याने पिस्तूल पुरविल्याची माहिती पोलीस कर्मचारी निलेश साबळे आणि दत्ता सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले.
हेही वाचा – मेट्रो सुरु करा, पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन
हेही वाचा – खबरदार…! रस्त्यावर न दिसल्यास होणार कारवाई, आयुक्तांचा इशारा
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, सहायक फौजदार राहुल मखरे यांनी ही कारवाई केली.