काही वर्षांपूर्वी व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कमिशन किंवा डोनेशन घेणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या संस्थांना आता विद्यार्थी मिळावेत यासाठी कमिशन देण्याची वेळ आली आहे. ‘विद्यार्थी द्या.. कमिशन मिळेल’ अशा योजनाच काही संस्थांनी सुरू केल्या आहेत, तर काही संस्थांनी शिक्षकांना नोकऱ्या टिकवण्यासाठी अभ्यासक्रमाला विद्यार्थी आणण्याचे फर्मान सोडले आहे.
व्यावसायिक शिक्षणात व्यवस्थापन अभ्यासक्रमांचा काही वर्षांपूर्वीपर्यंत तोरा होता. प्रवेश घेण्यासाठी जून-जुलैमध्ये संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून डोनेशनही देण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रांगा या संस्थांनी अनुभवल्या. मात्र, आता व्यवस्थापन अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. शहरातील बहुतेक महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोटा राखीव ठेवून त्याचे स्वतंत्र प्रवेश करणे बंदच केले आहे. या वर्षी राज्यातील एकूण ४२ हजार जागांवरील प्रवेशासाठी ३० हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज केले होते. दोन तुकडय़ा असणाऱ्या अनेक महाविद्यालयांना एक वर्ग भरेल इतकेही विद्यार्थी पहिल्या प्रवेश फेरीत मिळालेले नाहीत. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील जवळपास २५ महाविद्यालयांना पहिल्या फेरीत १० विद्यार्थीही मिळालेले नाहीत.
विद्यार्थी मिळावेत म्हणून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील संस्थेकडून आता कमिशन दिले जात आहे. विद्यार्थी देण्यासाठी, प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे इ-मेल अॅड्रेस, संपर्क क्रमांक आणि माहिती देण्यासाठी अशा योजनाच काही संस्थांकडून छुपेपणाने चालवल्या जात आहेत. दुसऱ्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना विद्यार्थी पाठवण्यासाठी संस्थांकडून कमिशनची लालुच दाखवली जात आहे. सध्या शुल्काच्या दहा टक्के रक्कम कमिशन म्हणून देण्याचे आमिष दाखवले जात असल्याचे एका संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या प्रवेश यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी बुधवापर्यंत मुदत आहे. संस्थेत प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेकडे पाठवण्यात यावे, यासाठी संस्थांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरातील छोटय़ा महाविद्यालयांमध्ये हे प्रकार सर्रास चालू आहेत. प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे ई-मेल अॅड्रेस आणि संपर्क क्रमांक आणि माहिती मिळवण्यासाठीही संस्था खर्च करत आहेत. या कमिशनच्या ट्रेंडमुळे या वर्षी कागदपत्रे पडताळणी केंद्र असलेल्या काही महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनाही सुगीचे दिवस अनुभवले आहेत.
काही संस्थांनी तर आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांनाच कामाला लावले आहे. पगार हवे असतील तर वर्ग भरण्यासाठी विद्यार्थी शोधून आणा, अशा सूचना शिक्षकांना देण्यात येत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या पातळीवरही विद्यार्थी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा