पुणे : सराफी पेढीवर प्राप्तीकर विभागाचा छापा पडणार असल्याची बतावणी करून पेढीतील व्यवस्थापकाने पाच किलो सोन्याचे दागिने, ५० किलो चांदी, रोकड असा दोन कोटी २७ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पसार झालेल्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद रमेश कुलकर्णी (वय ३५, रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत ज्योतीरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय २२, रा. निलगिरी लेन, बाणेर रस्ता, औंध) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी यांचे वडील राजेंद्र मोकाशी सहायक पोलीस आयुक्त आहेत. यश यांनी दोन वर्षांपूर्वी हडपसर परिसरातील माळवाडी परिसरात वसुंधरा ज्वेलर्स सराफी पेढी सुरू केली होती. आरोपी विनोद कुलकर्णी सराफी पेढीत व्यवस्थापक होता. त्यावेळी सराफी पेढीत दागिने घडविण्यासाठी पाच किलो सोने आणि ८५ किलो चांदी खरेदी करण्यात आली होती. यश यांनी सोने, चांदी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याला दिली होती. त्यानंतर यश उच्चशिक्षणासाठी लंडनला गेले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यश डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात आले. त्यांनी पुन्हा सराफी पेढीचे काम पाहण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता होणार काय?
दागिने घडविण्यासाठी पाच किलो सोने आणि ८५ किलो चांदी खरेदी करण्यात आली होती. यश यांनी चौकशी केली. तेव्हा पावणेतीन किलो सोने आणि ५० किलो चांदी कमी असल्याचे लक्षात आले. यश यांनी याबाबतची माहिती सहायक पोलीस आयुक्त असलेले वडील राजेंद्र मोकाशी यांना दिली. कुलकर्णीकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा ७ फेब्रुवारी रोजी सर्व सोने आणि चांदी परत करतो, असे सांगितले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी कुलकर्णीने सकाळी दहाच्या सुमारास सराफी पेढीतील कर्मचाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सराफी पेढीवर प्राप्तीकर विभागाचा छापा पडणार असल्याची बतावणी केली. सराफी पेढीच्या मालकांना हिशेब द्यायचा आहे. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास एक मोटार आली. सराफी पेढीतील कर्मचाऱ्यांनी कुलकर्णी याच्याकडे सोने आणि चांदी दिली. कुलकर्णीने सराफी पेढी बंद करण्यास सांगितले. कुलकर्णीने पाच किलो सोने, ५० किलो चांदी, रोकड अशी दोन कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे यश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास करत आहेत.