पुणे : राज्यातील एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (हाय सिक्युरीटी नंबर प्लेट -एचएसआरपी) बसवून घेणे बंधनकारक आहे. मात्र आतापर्यंत दीड कोटी जुन्या वाहनांपैकी सुमारे एक लाख वाहनांनाच नवीन क्रमांकाची पाटी लावल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने अंंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार वाहनधारकांनी ३१ मार्चपूर्वी ‘एचएसआरपी’ न लावल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे.

वाहनांची ओळख पटविणे, वाहन क्रमांकाच्या पाट्यांमध्ये होणारी छेडछाड थांबविण्यासाठी; तसेच वाहनांचा वापर करून होणारे गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ बंधनकारक करून राज्यांना अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात ‘आरटीओ’च्या नोंदणीनुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीची तब्बल दीड कोटी जुनी वाहने आहेत. राज्यात या नियमाच्या अंमलबजावणीची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागला. मात्र, ऑनलाइन यंत्रणेत तांत्रिक अडचण आली. ही पाटी लावण्यासाठी उत्पादक कंपन्या, ऑनलाइन प्रणाली नोंदणी सुविधा, वाहन स्वास्थ्य चाचणी केंद्र (फिटनेस सर्टीफिकेट सेंटर), पाटी बसवून देण्यासाठी साहित्याची उपलब्धता, उत्पादन क्षमता आदी नियोजन कोलडमले. संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या वाहनधारकांना वेळ उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे काही काळ ही सुविधा बंद करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर याबाबतची अंमलबजावणी करण्याचे आदेश ‘आरटीओ’ला दिले आहेत.

याबाबत राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. वाहनधारकांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ‘आरटीओ’ कार्यालयानुसार रोझमेर्टा सेफ्टी सिस्टीम, रिअल मॅझोन इंडिया आणि एफटीए एचएसआरपी सोल्यूशन या तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुन्या वाहनांची संख्या सुमारे दीड कोटी असल्याने तीन स्वतंत्र संकेतस्थळ, वाहन स्वास्थ्य प्रमाणपत्रासाठीचे केंद्रे वाढवली आहेत.’

उच्च सुरक्षा क्रमांक पाटीची प्रक्रिया राबविताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी केंद्रांची संख्या आणि वाहन स्वास्थ्य चाचणी केंद्रे वाढविण्यात आली आहेत. उपप्रादेशिक कार्यालयांची विभागणी करून कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी ३१ मार्चपूर्वी आधुनिक क्रमांकाची पाटी लावून घ्यावी. अन्यथा एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

अशी करा नोंदणी

– अर्जदाराने http://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे.

– अर्जासह पुढे जाण्यासाठी तुमचे कार्यालय निवडा.

– वाहनाचे पहिले ४ अंक टाकावे.

– ‘आरटीओ’ कार्यालयीन कक्षेनुसार विक्रेत्याचे संकेतस्थळ निवडावे.

– वाहन घेताना नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक, वाहनाचा मूलभूत तपशील भरावा.

– वाहन स्वास्थ्य केंद्राची सोयीनुसार वेळ आणि तारीख निश्चित करावी.

– ऑनलाइन शुल्क भरावे. – निवडलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार संबंधित केंद्रावर उपस्थित राहावे

Story img Loader