लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शिरुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द केली आहे. बारामतीमधून पक्षाने उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षविरोधी भूमिका बांदल यांनी घेतली होती. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केल्याचे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
वंचित बहुजन आघाडीने तीन दिवसांपूर्वी शिरुरमधून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, बांदल यांनी शुक्रवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले. त्यावरुन वंचितच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बांदल हे पुणे शहराचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या बैठकीला हजर होते.
वंचित बहुजन आघाडीने समाजमाध्यमातील आपल्या अधिकृत पेजवरुन बांदल यांची उमेदवारी रद्द केल्याचे सांगितले आहे. त्यात प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.
बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला. त्या धोरणाविरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले.