रसिकांच्या प्रेमामुळे कविता लिहिण्याची नवीन उमेद मिळते. कविता लिहिणे, तिच्यासाठी प्रयत्न करणे, हेच माझे जगणे झाले असून रसिकांच्या टाळ्या याच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी चिंचवड येथे केले. रोटरी क्लब चिंचवडच्या शिशीर व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी पाडगावकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मानपत्र व ५१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. चिंचवड नाटय़गृहात झालेल्या समारंभास उद्योजक बाळासाहेब भापकर, रोटरीचे प्रांतपाल दीपक शिकारपूर, चिंचवड रोटरीचे अध्यक्ष गणेश कुदळे आदी उपस्थित होते. या वेळी पाडगावकरांच्या गाजलेल्या कविता व गाण्यांच्या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यास रसिकांकडून दाद मिळाली. विद्याधर रिसबूड यांनी पाडगावकरांची मुलाखत घेतली. तेव्हा, पाडगावकर यांनी जीवनातील महत्त्वाचे प्रसंग उलगडून दाखवले तसेच गमती-जमतीही सांगितल्या. अनघा रत्नपारखी यांनी मानपत्राचे वाचन केले. शिल्पागौरी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद शेट यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा