महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना ‘मसाप सन्मान’ तर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना ‘भीमराव कुलकर्णी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
परिषदेच्या १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त २७ मे रोजी निवारा सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी साहित्य परिषदेच्या खेड शाखेतर्फे मंगेश पाडगावकर यांच्या काव्यावर आधारित कार्यक्रम होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन आणि कार्यवाह नंदा सुर्वे उपस्थित होत्या.
वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला २६ मे रोजी निवारा सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘विशेष ग्रंथकार पुरस्कार’ आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कारविजेत्या लेखकांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. यशवंत पाठक (संतसाहित्य), आशुतोष जावडेकर (संगीतसमीक्षा), अनुराधा पाटील आणि गुरु ठाकूर (कविता), प्रकाश तुपे (विज्ञान), उमा कुलकर्णी (अनुवाद), डॉ. विवेक बेळे (नाटय़), मदन हजेरी (बालसाहित्य), कविता महाजन (लेखिका पुरस्कार) यांना विशेष ग्रंथकार पुरस्कार तर, महाबळेश्वर सैल, डॉ. रमेश धोंगडे, ल. वा. गोळे, अॅड. वि. पु. शिंत्रे, प्रल्हाद यादव, अरिवद व्यं. गोखले, प्रा. व. वा. बोधे, छाया महाजन, सुहास मंत्री, विजया मेहता, डॉ. पां. ह. कुलकर्णी, डॉ. संदीप केळकर, डॉ. मुहम्मद आजम, डॉ. देवानंद सोनटक्के, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. इंदुमती अरकडी, अन्वर राजन, डॉ. पुष्पा भावे, अमोल वाघमारे, मोहन आपटे, उत्तम कांबळे, सुलभा ब्रह्मनाळकर, श्रीनिवास भणगे हे वार्षिक ग्रंथ पुरस्काराचे मानकरी आहेत. परिषदेच्या कामामध्ये योगदान देणारे म. श्री. दीक्षित यांचा नव्वदीत प्रवेश केल्याबद्दल, तर डॉ. वि. भा. देशपांडे आणि ह. ल. निपुणगे यांचा अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा