रस्ते अपघात कमी होण्याच्या दृष्टीने पुण्यातील नळ स्टॉप चौकात गेल्या वीस वर्षांपूर्वी दिवंगत व्यंगचित्रकार मंगेश तेंडूलकर यांनी दिवाळीत वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारे पत्रके वाटण्याचे काम सुरु केले होते. गेल्यावर्षी त्यांचे निधन झाल्यानंतरही त्यांचा हा उपक्रम अखंडपणे सुरु ठेवण्यात आला आहे. यासाठी त्यांच्या मुलीने पुढाकार घेतला असून त्यांना या कामात अनेक अपघातग्रस्त नागरिक मदत करीत आहेत. अनेकांना हा उपक्रम आपल्यावर ओढवलेला प्रसंग दुसऱ्यावर ओढवू नये याच्या प्रबोधनासाठी प्रेरणा देत आहे.

देशभरात रस्ते अपघातामध्ये अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, प्रशासन आणि विविध संस्था नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. मात्र, तेंडूलकरांनी खासगीरित्या स्वतःहून या प्रबोधन उपक्रमाला सुरुवात केली होती.

मंगेश तेंडुलकर यांचे निधन २३ जुलै २०१७ रोजी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी वंदना यांनी या उपक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यानुसार आज (मंगळवारी) सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कर्वे रस्त्यावरील नळ स्टॉपच्या सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांना वाहतुकींच्या नियमांची पत्रके वाटण्यात आली. या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणार्‍या शशी स्वामी आणि सुनंदा जप्तीवाले या दोन महिला कार्यकर्त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. त्या सिग्नलला थांबलेल्या प्रत्येक वाहनचालका जवळ जाऊन दादा, ताई गाडी नीट चालवा आपल्या घरी कोणी तरी वाट पाहत असते, असं आवर्जून सांगत त्यांचे प्रबोधन करीत होत्या.

शशी स्वामी म्हणाल्या, मी तेंडूलकर सरांच्या उपक्रमात २००४ या वर्षापासून सहभागी झाले आहे. त्यालाही कारण होते, ते म्हणजे माझ्या मुलाला २००३ मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर औंध येथे एका कंपनीत जॉब लागला. मी आणि माझे पती बँकेमधून सेवानिवृत्त झालो होतो. त्याचदरम्यान मुलास जॉब लागल्याने घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. विनायक जॉबसाठी औंध जात असताना राजीव गांधी पुलावर त्याच्या गाडीला अपघात झाला. त्या अपघातामध्ये तो गेला त्यामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये यासाठी आम्ही आज अखेर मंगेश तेंडूलकर सरांच्या वाहतूक नियमाच्या उपक्रमात सहभागी होत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक व्यक्तीशी संवाद साधला जातो. त्यातून एक समाधान मिळते. पण मुलास गमावल्या चे दुःख खूप असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुनंदा जप्तीवाले म्हणाल्या, माझ्या मुलीने २००५ मध्ये वाडिया महाविद्यालयात एमटेकला प्रवेश घेतला होता. तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता. त्यासाठी ती एम 80 वरून कॉलेजला जात असताना रुबी हॉल रुग्णालयाजवळ तिच्या गाडीला एका ट्रेलरने जोरात धडक दिली, त्यात तिचा मृत्यू झाला. या अपघातापूर्वीच १ ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती करण्यात आली होती आणि ती हेल्मेटघालून निघाली होती. मात्र, त्या ट्रेलर चालकाच्या चुकीमुळे माझ्या मुलीचा जीव गेला. त्यामुळे प्रत्येकाने वाहन सावकाश चालवावे आणि आपलं घरी कोणी तरी वाट पाहत आहे, एवढं लक्षात ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.