आंब्याचा हंगाम संपल्यानंतरही वर्षभर आमरस किंवा मँगो पल्प चाखायला मिळावा, असं वाटत असेल, तर आताच आंब्यांची खरेदी करायला हवी. उत्तम प्रतीचे आंबे कॅनिंग सेंटरमध्ये नेऊन द्या आणि तेथून बाटलीबंद पल्प घरी घेऊन जा..
तर हंगाम आंब्यांचा आहे. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सहज चक्कर मारली तर लक्षात येतं, की आंब्यांचा हंगाम कसा असतो, तिथे आंबाशौकीन कसे गर्दी करतात, हापूस आंबा म्हणजे काय, पायरीचं वैशिष्टय़ं काय, कर्नाटक हापूस म्हणजे काय, गावठी आंबा म्हणजे काय.. या आणि अशा अनेक गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर मार्केट यार्डमध्ये फेरफटका मारावा. अर्थात आंबा हे हंगामी फळ. मे महिना संपला की हा हंगाम संपतो.. पुढे काय?, पुढे वर्षभर आमरसाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर पर्याय एकच. सध्या मस्त हंगाम सुरू आहे. तुमच्या आवडीनुसार छान हापूस खरेदी करा आणि रस काढून तो कॅनिंगला द्या. हवाबंद केलेल्या या बाटल्या वर्ष-दोन वर्ष छान राहतात.
अनेकांना कॅनिंग हा मोठा उपद्व्याप वाटतो. पण तसं काही नाही. आपल्याला आवडणारे आंबे बाजारात खरेदी करायचे आणि ते सरळ कॅनिंग सेंटरमध्ये नेऊन द्यायचे एवढी ही सोपी गोष्ट आहे. आंब्यांच्या दिवसात हमखास आठवण येते ती पद्मा कॅनिंग सेंटरची. सुनंदा गलांडे यांनी सहकारनगरमध्ये सुरू केलेलं हे कॅनिंग सेंटर आपल्यासारख्या घरगुती ग्राहकांसाठी मस्त ठिकाण आहे. सुनंदा गलांडे गेली पंधरा वर्ष व्यवसायात आहेत आणि अशा प्रकारच्या व्यवसायाची कोणतीही घरगुती पाश्र्वभूमी नसताना केवळ कष्ट आणि उत्तम दर्जा यांच्या बळावर त्यांनी या व्यवसायात चांगलं नाव आणि यशही मिळवलं आहे. गलांडे या मूळच्या शिक्षिका. अध्यापन क्षेत्रातल्या पंधरा वर्षांच्या अनुभवानंतर त्यांनी सरबतं, सॉस, पल्प, तयार पिठं वगैरेंचं उत्पादनं सुरू केलं आणि त्यांच्या विक्रीसाठी जवळपास पाच-सातशे प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. गेली दहा-बारा वर्ष मात्र त्यांनी आंबा कॅनिंगवरच लक्ष केंद्रित केलं आहे.
आंब्यांचा हंगाम संपल्यानंतरही घरी कधी आमरस खावासा वाटला, कधी मँगो मिल्क शेक करावासा वाटला, कधी मँगो पल्प चाखावासा वाटला तर अशावेळी आपण तयार करून आणलेला पल्प घरी असला की रसाचा आस्वाद मनसोक्त घेता येतो. गलांडे यांच्या कॅनिंग सेंटरमध्ये आपण फक्त आंबे नेऊन दिले तरी चालतात किंवा आंब्याचा रस नेऊन दिला तरी चालतो. एकदा आपण आंबे नेऊन दिले की पुढे काय काय प्रक्रिया होते ती माहिती देखील रंजक अशीच आहे. गलांडे यांच्या बंगल्याच्या अंगणात आणि तळ मजल्यावर या सगळ्या प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आंब्यांच्या पेटय़ाच्या पेटय़ा लागलेल्या असतात. दुसरीकडे आमरसाच्या तयार बाटल्यांच्या पेटय़ा भरलेल्या दिसतात. तिसरीकडे दहा-बारा जणी आंबे सोलत बसलेल्या दिसतात. एकीकडे रस उकळत असतो.. वर्णनापेक्षा हे दृश्य पाहाणं खूपच मस्त आहे.
कॅनिंग सेंटरमध्ये आंबे आल्यानंतर प्रथम ते सुरीनं सोलले जातात. नंतर बाठ वेगळी करून आंब्याच्या फोडी केल्या जातात. त्या फोडी पल्परमध्ये टाकून रस काढला जातो. नंतर त्यात प्रमाणात साखर मिसळली जाते आणि रसाला उकळी आली की तो उकळता रस बाटल्यांमध्ये शिगोशीग भरून बाटल्या यंत्रावर झाकणाने सीलबंद केल्या जातात. हा रस वर्षभर व्यवस्थित राहतो. बाटली फ्रिजमध्येही ठेवायची गरज पडत नाही. फक्त एकदा ती उघडली की मात्र दोन-तीन दिवसांत संपवावी लागते. गलांडे यांच्या या कॅनिंग सेंटरमध्ये घरगुती ग्राहकांइतकाच व्यापारी आणि व्यावसायिक वर्गही मोठय़ा संख्येने येतो. अगदी दोन डझन आंबे घेऊन येणाऱ्यांपासून ते टेम्पो भरून पेटय़ा पाठवणाऱ्यांपर्यंत इथे येणाऱ्यांमध्ये वैविध्यं आहे.
या उन्हाळी हंगामाची तयारी कॅनिंग सेंटरमध्ये जानेवारीमध्येच सुरू होते. बाटल्या गोळा करणं, त्या उकळवून र्निजतुक करणं अशी कामं सुरू होतात. मार्चच्या अखेरीस प्रत्यक्ष कॅनिंगचं काम सुरू होतं आणि पुढे ते जुलैपर्यंत चालतं. आपण जे आंबे नेऊन देतो त्याचाच पल्प आपल्याला मिळतो ही खात्री इथे आहे. त्यामुळे सुनंदाताईंकडे दरवर्षी पेटी नेऊन द्यायची आणि पाच-सात बाटल्या मँगो पल्प वर्षांसाठी घेऊन जायचा असा शेकडो कुटुंबाचा ठरलेला कार्यक्रम आहे. मुख्य म्हणजे सगळे इथल्या पल्पवर खूश असतात. आंब्यांचा हंगाम आता जोरात आहे. वर्षभरासाठी पल्पची साठवण करायची असेल, तर कॅनिंगचा विचार करायला हवा हे निश्चित.
कुठे आहे?
पद्मा कॅनिंग सेंटर अथर्व, २०७१ – ९ ब, सहकारनगर क्रमांक- १ दाते बस स्टॉप जवळ दूरभाष: २४२२६४१७