पुणे : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे समुद्रमार्गे होणारी निर्यात बंद आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. वाढीव दरानेही आंबा निर्यातीसाठी निर्यातदारांना कोटा मिळत नसल्यामुळे आंबा निर्यात सुमारे ५० टक्क्यांनी घटली आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे समुद्रमार्गे होणारी निर्यात बंद आहे. त्यामुळे सर्व प्रकारची निर्यात हवाईमार्गे सुरू आहे. परिणामी हवाई वाहतुकीवर मोठा ताण आला आहे. हवाई वाहतूक दरात सरासरी २५ टक्क्यांनी वाढ झाली. वाढीव दरानेही आंबा निर्यात करण्यासाठी निर्यातदार तयार आहेत. पण हवाई वाहतूक कंपन्यांकडून आंबा निर्यातीसाठी अपेक्षित कोटा मिळत नाही, अशी माहिती पणन मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार

यंदा राज्यात आंबा उत्पादन चांगले आहे. निर्यातक्षम दर्जाचा हापूस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. निर्यातीत मोठी वाढ होण्याचा अंदाज होता. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने एकूण पाच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते. पण ते गाठणे कठीण दिसत आहे. आतापर्यंत सुमारे १२०० टन आंबा निर्यात होणे अपेक्षित होते. पण यंदा २३ एप्रिलअखेर वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून फक्त ६२५ टन आंब्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षी हापूसचे उत्पादन कमी असतानाही केवळ अमेरिकेला ८५० टन आंबानिर्यात झाली होती. निर्यात सुविधा आणि आंब्याची उपलब्धता चांगली असतानाही निर्यात घटली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा मोठा फटका आंबा निर्यातीला बसत आहे.

वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांचे व्यापारी संजय पानसरे म्हणाले, की यंदा अमेेरिकेतून आंब्याला मोठी मागणी आहे. पण वाहतुकीत अडचणी येत आहेत. नाशवंत शेतमालाच्या निर्यातीला हवाई वाहतूक कंपन्यांकडून प्राधान्य मिळणे अपेक्षित असतानाही बिगरनाशवंत मालाच्या निर्यातीला प्राधान्य दिले जात आहे. राज्यात निर्यातक्षम आंब्याची उपलब्धता चांगली आहे. हवाई वाहतूक कंपन्यांनी सहकार्याची भूमिका घेतल्यास अजूनही निर्यातीत वेगाने वाढ होऊ शकेल.

हेही वाचा >>>प्रवाशांना खुषखबर! रेल्वे देतेय स्वस्तात जेवण; जाणून घ्या कोणत्या स्थानकावर सुविधा… 

मुंबईतून ६२५ टन आंबा निर्यात

पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून २३ एप्रिलअखेर सुमारे ६२५ टन आंब्याची निर्यात झाली आहे. ब्रिटनला ४००, अमेरिकेला २००, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडला प्रत्येकी १५ आणि जपानला तीन टन आंब्याची निर्यात झाली आहे. एक मार्चपासून सुरू झालेली निर्यात ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. अमेरिकेला १० एप्रिलपासून सुरू झालेली निर्यात २८ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. दक्षिण कोरियाला २८ एप्रिलपासून निर्यात सुरू होणार आहे. आंबा निर्यातीत सर्वाधिक ६० टक्क्यांपर्यंत हापूसचा वाटा आहे. त्या खालोखाल केशर, बेगनपल्ली, बदामी आदी जातींच्या आंब्याचा समावेश आहे. एप्रिलअखेरपासून गुजरातमधील केशरची निर्यात सुरू होईल.

निर्यातीवर मोठा परिणाम

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे हवाई वाहतूक दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीव दरानेही निर्यातदार आंबा निर्यातीस तयार आहेत. पण हवाई वाहतूक कंपन्यांकडून आंब्याला निर्यात कोटा मिळत नाही. यंदा हापूससह अन्य आंब्याचे उत्पादन चांगले आहे. निर्यातीला चांगली संधी होती. पण युद्धामुळे मोठा फटका बसत आहे. दोन शेतकरीउत्पादक कंपन्याही आंबा निर्यात करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम यांनी दिली.