पुणे : हवामान बदलामुळे कोकणातील हापूसप्रमाणेच कर्नाटकातील आंब्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. कर्नाटकातील आंब्याचा हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे.कर्नाटकातील तुमकूर भागात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कर्नाटकातील आंब्याची चव हापूसप्रमाणेच असल्याने गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील आंब्याला मागणी वाढत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कर्नाटकातील आंब्याला चांगला मोहोर आला होता. हवामान बदलामुळे मोहोर गळून उत्पादनात घट झाली. नेहमीच्या तुलनेत यंदा कर्नाटकातील आंबा उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे यंदा कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू होण्यास महिनाभर विलंब झाला आहे.
मार्च महिन्यात आंब्याची आवक कमी झाली होती. दर वर्षी एप्रिल महिन्यात कर्नाटकातील आंब्याच्या ७०० ते ८०० पेट्यांची दररोज आवक होते. यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकातील आंब्यांच्या २०० पेट्यांची आवक होत आहे. यंदा ही आवक १५ एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे १५ जूनपर्यंत कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू राहील, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
कोकणातून हापूसची आवक वाढली
‘मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणातून हापूसची आवक वाढली आहे. गुढी पाडव्याला बाजारात एक ते दोन हजार पेट्यांची आवक झाली होती. सध्या बाजारात हापूसच्या चार ते पाच हजार पेट्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात तयार हापूसला प्रतवारीनुसार ६०० ते ८०० रुपये डझन दर मिळाले आहेत,’ अशी माहिती मार्केट यार्डातील अंबा व्यापारी युवराज काची यांनी दिली.
गेल्या वर्षी पाऊस लांबला होता. त्यामुळे लागवडीस विलंब झाला. जानेवारी महिन्यात उष्मा वाढल्याने लागवडीवर परिणाम झाला. यंदा कर्नाटकातील आंब्याची लागवड नेहमीच्या तुलनेत ५० टक्के झाली आहे.- रोहन उरसळ, कर्नाटक आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड