पुणे : ‘शेती हा भांडवली व्यवसाय आहे. शेतकऱ्याकडे भांडवल नसेल, तर शेतकरी शेती करू शकणार नाही. पैशांअभावी शेतकरी बँकांकडून कर्ज काढतो आणि कर्जबाजारी होतो. शेतकरी अडचणीत आला, की सरकारही त्याला मदत करत नाही. या परिस्थितीमध्ये वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी वेगळा विचार करतो,’ असे सांगून राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी हे चक्र थांबविण्यासाठी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक आवश्यक असून, सरकारी खर्चाने शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्याचेही विचाराधीन असल्याचे सांगितले.
राज्यस्तरीय कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बालेवाडी येथील कार्यशाळेचे उद्घाटन ॲड. कोकाटे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक विनायक कोकरे, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ या वेळी उपस्थित होते.
‘हवामान बदलामुळे शेतीपुढे आव्हाने आहेत. बदलत्या काळात शेती कशी सुरक्षित राहील, कमी खर्चात उच्च दर्जाचे उत्पादन कसे वाढविता येईल, याबाबत प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणेही आवश्यक आहे. उत्पादनामध्ये वाढ झाली म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे होत नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखणे, त्याची जाहिरात करणे, विपणन आणि बाजारपेठेसह बाजारभाव मिळणे यासाठी मूल्यवर्धित साखळी करावी लागणार आहे,’ असे कोकाटे यांनी सांगितले. दरम्यान, कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले.
‘वागण्या-बोलण्यात चुका; मात्र हेतू प्रामाणिक’
मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार दिल्याचे समजले. मात्र, प्रत्येकाने त्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, हा आशिष जैस्वाल यांचा धागा पकडून माणिकराव कोकाटे यांनी ‘मंत्रिपदाचे मला काही वाटत नाही. मंत्रिपदाची अपेक्षाही नव्हती. मी हुशार किंवा मोठा माणूस नाही. सामान्य घरातून आलेला मंत्री आहे. त्यामुळे वागण्यात-बोलण्यात किंवा करण्यात चार-दोन चुका होऊ शकतात. मात्र, माझा हेतू प्रामाणिक आहे,’ असे सांगितले.