मनोहर जोशी आणि षडयंत्र हे समीकरणच झाले आहे. त्यांना सगळीकडे षडयंत्रच दिसते, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोशी यांनी केलेल्या टीकेला मंगळवारी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेतून मी आणि छगन भुजबळ बाहेर पडल्यानंतर शिवसेना आकुंचन पावत चालली आहे आणि सरांसाठी ती चांगलीच गोष्ट ठरली आहे, असाही टोला राणे यांनी या वेळी लगावला.
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानतर्फे आयोजित लोकमान्य दिवाळी महोत्सवाची सांगता मंगळवारी महाफराळ या कार्यक्रमाने करण्यात आली. या कार्यक्रमात राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी जोशी यांच्या टीकेला उत्तर दिले. मी मुख्यमंत्रिपदी असताना मी त्याच पदावर राहावे अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती; पण राणे यांच्या षडयंत्रामुळे मला पदावरून जावे लागले, असा दावा जोशी यांनी केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, की जोशी यांनी सगळीकडेच षडयंत्र दिसते. मनोहर जोशी आणि षडयंत्र हे समीकरणच झाले आहे.
राणे, भुजबळ शिवसेना सोडून गेले हे चांगलेच झाले, असेही विधान जोशी यांनी केले आहे. त्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, ‘आम्ही आता जेथे आहोत, तेथे चांगले आहोत; पण आम्ही शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर शिवसेना अधिकाधिक आकुंचन पावत चालली आहे. त्यामुळे सरांसाठी ती चांगली गोष्ट ठरली आहे.’ लोकसभा निवडणुकीतील पुण्याच्या उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले, की योग्य आणि सक्षम उमेदवार दिला जाईल आणि त्याचा निर्णय योग्यवेळी हायकमांडच घेईल.
पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केल्याचे सांगितल्यानंतर राणे म्हणाले, की पुण्याची जागा आमची आहे आणि आमचाच हक्क या जागेवर आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. योग्यवेळी हायकमांड निर्णय घेईल.

Story img Loader