संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांचे प्रतिपादन
भारतीय संरक्षण दलासाठी आवश्यक सामग्री खरेदी करताना आयातीपेक्षाही स्वयंपूर्णतेवर अधिकाधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे संरक्षणदृष्टय़ा सज्जतेबरोबरच आयातीमध्ये होणारा भ्रष्टाचार कमी होईल, नवीन रोजगार निर्मितीबरोबरच अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी रविवारी केले. येत्या चार वर्षांत भारत क्षेपणास्त्रांमध्ये स्वयंपूर्ण असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘संरक्षण उत्पादने- आत्मनिर्भरता आणि भविष्यातील वाटचाल’ या विषयावर र्पीकर यांचे व्याख्यान झाले. सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या व्याख्यानाला रसिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.
संरक्षण सामग्री खरेदी आणि भ्रष्टाचार हे एकेकाळी समीकरण होऊन बसले होते. संरक्षण दलासाठी आवश्यक सामग्री आयात करायची आणि त्यातील पैसे ‘टॅक्स हेवन’मध्ये गुंतवायचे.
असे केल्यामुळे जेथे हे पैसे गुंतविले त्या देशातील नियमांमुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) त्याबाबतची माहिती मिळणे मुश्कील होते आणि पुरावे नसल्याने पुढे काही होत नाही. त्यामुळे भ्रष्टाचारासाठीच आयातीवर भर देण्यात आला असावा, असा टोला र्पीकर यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता लगावला.
भविष्यामध्ये केवळ शस्त्रास्त्र निर्मितीवरच नाही तर त्यांच्या निर्यातीवरही भर देण्यात येईल, असे सांगून र्पीकर म्हणाले, तोफांच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘धनुष’ तोफेबरोबरच देशातील खासगी कंपनीनेही एक उत्तम तोफ विकसित केली आहे. देशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाने ६ हजार ८०० तासांहून अधिक उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. त्यांची ‘स्क्वाड्रन’ या वर्षअखेरीपर्यंत हवाई दलात दाखल होईल. क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरबाबत चार वर्षांत भारत स्वयंपूर्ण होईल.
संरक्षण म्हणजे आक्रमण असा अर्थ नसतो. भारताने कधीही स्वत:हून आक्रमण केलेले नाही आणि करणारही नाही, असे सांगून र्पीकर म्हणाले, आपली ताकद वाढवून सक्षम झाल्यास दुसरा देश कुरापत काढणार नाही. परंतु, कोणी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना योग्य धडा देऊ शकतो, तसे उत्तर आपण दिलेही आहे. समजा युद्ध झालेच तर, आपल्याला शस्त्रे पुरविणारा देश तटस्थ राहिला किंवा त्याने आपल्याला शस्त्रे पुरवायची नाहीत अशी भूमिका घेतली, तर आपली अडचण होऊ शकते. त्यामुळे स्वयंपूर्णता महत्त्वाची असून संरक्षण उत्पादनांमध्ये आपण ६० ते ७० टक्के स्वयंपूर्ण होऊ.
महिला समावेशाला विरोध नाही
लढाऊ तुकडीमध्ये महिलांच्या समावेशाला विरोध नाही. झाशीची राणी लढली होती तर, इतर महिलादेखील लढू शकतील. मात्र, महिलांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी काही काळ जावा लागेल. तोपर्यंत वाट पाहावी लागेल, असेही र्पीकर यांनी सांगितले.