दोषी लोकप्रतिनिधींना अभय देण्यासाठी मंत्रिमंडळाने केलेला कायदा फाडून टाका, असे म्हणणाऱ्या राजकीय नेत्याचे चारित्र्य आणि भूमिका संशयास्पद वाटते, अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नामोल्लेख टाळून राहुल गांधी यांना रविवारी टोला लगावला. आम्ही चूक केली हे मान्य करून ती दुरुस्त करण्याचे धाडस का नाही करीत, असा सवालही त्यांनी केला.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती पर्वती भागातर्फे आयोजित ‘विवेकानंद विचार संगम’ कार्यक्रमात पर्रीकर बोलत होते. व्याख्याते विवेक घळसासी, समितीचे पश्चिम क्षेत्र संयोजक डॉ. शरद कुंटे, महानगर संयोजक अॅड. प्रशांत यादव आणि पर्वती भाग संयोजक रवींद्र शिंगणापूरकर या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी मानसशास्त्र विषयात सुवर्णपदकाची मानकरी संहिता करमळकर, महिला बॉक्सर चंदा उदनशिवे आणि ढोल-ताशा महासंघाचे अनिल गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.
ज्ञान आणि चारित्र्य यातून समाज घडतो, असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. मात्र, याच दोन गोष्टींचा देशामध्ये अभाव असल्याचे सांगून पर्रीकर म्हणाले, ४० कोटी युवा लोकसंख्या असलेला देश परमवैभवापर्यंत का पोहोचू शकत नाही, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. आठवीपर्यंत सर्वाना उत्तीर्ण करणे ही चांगली संकल्पना आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत विद्यार्थी कोऱ्या उत्तरपत्रिका देत शिक्षकांनाच नापास करण्याचे आव्हान देताना दिसून येतात. ज्ञानाला अवकळा प्राप्त झाली असून सध्याच्या शिक्षण पद्धतीतून ज्ञान संपादनाची प्रक्रिया घडत नाही. संस्कारातून पारखून घेण्याची मिळालेली शक्ती म्हणजे ज्ञान. केवळ कायदा करून सगळे प्रश्न सुटणार नाहीत. समाजाची मन:स्थिती चांगली असेल, तर कायदे करण्याची गरजच भासणार नाही. चारित्र्यशून्य राजकीय नेत्यांमुळे सरस्वती आणि लक्ष्मी आपल्या देशातून निघून गेली आहे.
विवेक घळसासी म्हणाले, देशाला महासत्ता नव्हे तर, महागुरू करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील लघुत्वाचा त्याग करून गुरुत्वाची कास धरावी. महासत्ता असे म्हणताना त्यामध्ये सत्तेची आकांक्षा आहे. तर, गुरुत्वामध्ये दातृत्व आहे. त्यामुळे महासत्तेपेक्षाही महागुरू होणे महत्त्वाचे आहे. हर्षवर्धन खेर यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा