पुणे : चित्रपट, दूरचित्रवाणी अशा माध्यमांमुळे रंगभूमी संपेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. आता इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढी रंगभूमीकडे वळत आहे. त्यामुळे रंगभूमी पुन्हा बहरलेली दिसेल, असा आशावाद ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी यांनी व्यक्त केला. 

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी बाजपेयी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रंगभूमी, चित्रपट, ओटीटी अशा अनुषंगाने त्यांनी भाष्य केले. वेगवेगळ्या कला प्रकारांचा मिलाफ असलेली फिरोदिया करंडक स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्पर्धेतील सादरीकरण पाहण्याचा अनुभव फारच कमाल असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दूरचित्रवाणी, चित्रपट आणि ओटीटीच्या काळात रंगभूमीचे अस्तित्व टिकण्याविषयी बाजपेयी म्हणाले, की रंगभूमीसमोर अनेक आव्हाने आली. पण रंगभूमीवरील कलाकारांची प्रतिभा पाहिल्यास या मंचावर काम केलेले कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. आज ज्या ज्या शहरात जातो, तिथे नाट्यसंस्था सक्रीय झालेल्या दिसतात. त्यामुळे इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढी रंगभूमीकडे वळत आहे ही चांगली बाब आहे.

कलाकार व्हायचे असल्यास दूरचित्रवाणी, चित्रपट किंवा ओटीटी या कोणत्याही माध्यमाचा विचार करू नये. दोन ते तीन वर्ष समर्पित भावनेने काम शिकण्याला प्राधान्य दिले पाहिजे. काम शिकल्यावर अधिक काळ टिकून राहता येते. त्यामुळे शिकणे खूप महत्वाचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. आजवर दिग्गज कलाकारांसह काम करण्याच्या अनुभवाविषयी बाजपेयी म्हणाले,  ज्यांचा अभिनय बघून लहानाचे मोठे झालो, जे आपले आदर्श आहेत,. ज्यांना केवळ पडद्यावरच पाहिले आहे, ते दिग्गज कलाकार सहकलाकार म्हणून समोर आल्यावर स्वत:वर विश्वास बसत नाही.  अनेक वर्ष काम करून, प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून ते टिकून राहिले आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.

Story img Loader