लोणावळा : लाखोच्या संख्येने मराठा समाज मुंबईला फिरायला नाही तर लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आरक्षण मागायला चालला आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी लोणावळा येथील सभेत केली.
आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे निघाला आहे. वाशी येथे मुक्काम करत शुक्रवारी (२६ जानेवारी) पदयात्रा वाशी ते मुंबई असा पायी प्रवास करत आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी जाणार आहे. दरम्यान आज लोणावळ्यातून वाशी कडे जाताना पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना द्रुतगती मार्गावरून जाऊ न देता जुन्या मार्गाने जाण्याची विनंती केली.
जरांगे म्हणाले, की कोठूनही घेऊन जा, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही. आझाद मैदानावरच आमरण उपोषण करण्यावर आम्ही ठाम आहेत.
शासनाच्या दोन शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगे दुपारी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत
मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी समोर यावे आणि आरक्षणाच्या आमच्या मागण्या मान्य करत तोडगा काढावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
जरांगे यांच्या वाकसई चाळ येथील सभेला अडीच ते तीन लाख मराठा समाज बांधव उपस्थित होते. तीन वाजता सकल मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाल्याने राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज जागोजागी जमल्याने पदयात्रा वाकसई चाळ येथे तब्बल दहा तास उशिराने पोहोचली.
हेही वाचा : मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी नाकारली
मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे मुंबईत कोणतीही गडबड गोंधळ होणार नाही याचा शब्द मी समाजाच्या वतीने देतो असे जरांगे यांनी सांगितले. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आणि त्यांचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. ओबीसी मधूनच समाजाला आरक्षण द्यावे या आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम असून शासनाने त्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही एकजूट कायम ठेवा. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.