पिंपरी : आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या उपोषणाला मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. ही पदयात्रा २४ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार आहे. पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजच्या वतीने सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदयात्रेच्या स्वागताच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या झालेल्या आढावा बैठकीला प्रकाश जाधव,नकुल भोईर,राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर उपस्थित होते. मनोज जरांगे यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे. रक्षक चौक,जगताप डेअरी,काळेवाडी फाटा,डांगे चौक,पदमजी पेपर मिल मार्गे चापेकर चौक चिंचवडगाव असा मार्ग असणार आहे. पुढे चिंचवड स्टेशन,खंडोबा मंदिर,आकुर्डी,निगडी,भक्ती-शक्ती समुह शिल्प,तळेगाव मार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत.

पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ दिला जाणार नाही. आंदोलकांना जेवण, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. आरोग्याविषयी आंदोलकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्य मदत केंद्र उभारली जाणार आहेत. पदयात्रा मार्गावर मदत केंद्रे उभारून सहकार्य करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने केले आहे.

हेही वाचा : “मुंबईच्या आंदोलनात मराठ्यांविरोधात ट्रॅप”, मनोज जरांगेंनी सांगितला ‘असंतुष्ट आत्म्यां’चा डाव, म्हणाले, “रॅलीत येऊन…”

मारुती भापकर म्हणाले की, गेल्या पाच महिन्यांपासून मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारचे आंदोलन करत आहे. विविध आश्वासने राज्य सरकारने वेळोवेळी दिली आहेत. परंतु आजपर्यंत सरकारने कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शहरात जरांगे-पाटील व आंदोलकांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.