मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनोज जरांगेंनी सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही, असं म्हटलं. ते शुक्रवारी (२० ऑक्टोबर) जुन्नरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “काल आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. आपल्या परिवारातील सदस्य गेला आहे. त्यामुळे आज आपल्याला हार-फुलं काहीच घ्यायचं नाही. त्याच्या जाण्याचं आपल्याला दुःख असलं पाहिजे. त्याचं स्वप्न होतं की, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.”

“सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार”

“सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. मराठा समाजाचे पोरं हट्ट करायला लागले. याला पूर्णपणे जबाबदार सरकार आहे. जगात आमच्यासाठी शिवनेरीपेक्षा मोठं आणि पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. मी आज शिवनेरी किल्ल्यावरून जाहिरपणे सांगतो की, आमच्या आत्महत्या होत आहेत याला सरकार जबाबदार आहे. त्यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “मोदी-शाह-शिंदेंना वेळ नसेल, तर…”; मराठा आरक्षणावर मनोज जरांगे आक्रमक, स्पष्टच म्हणाले…

“…तर मग तो वेळच कशासाठी घेतला”

दरम्यान, याआधी मनोज जरांगे म्हणाले होते, “आता २२ ऑक्टोबरला सभा होणार नाही. आम्हाला आता आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो की, सरकार आरक्षण देणार आहे. कारण सरकारने त्यासाठी वेळच घेतला आहे. जर आरक्षण देणार नव्हते, तर मग तो वेळच कशासाठी घेतला.”

हेही वाचा : “छगन भुजबळ यांची वक्तव्ये महाराष्ट्रातील समाजात आग लावणारी, हा विषय…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

“आम्ही सरकारला दिवाळीप्रमाणे १० दिवस बोनस दिले”

“मराठा समाज उद्या त्यांना प्रश्न विचारेल की, आरक्षण द्यायचं नव्हतं तर मग वेळ कशासाठी घेतला. सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला होता, आम्ही ४० दिवस दिले. आम्ही दिवाळीप्रमाणे १० दिवस बोनस दिले आहेत. त्यांना आणखी काय पाहिजे,” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil allege responsibility of government over sunil kavale suicide pbs
Show comments