मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. जरांगे शुक्रवारी (२० ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी राजगुरूनगर येथे भव्य सभा घेतली. या सभेत मनोज जरांगे यांचं भाषण संपल्यानंतर अचानक एक तरूण मंचावर चढला आणि त्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनोज जरांगे संतापलेले पाहायला मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे पाटील मंचावर असतानाच अचानक एक तरूण मंचावर आला. हा तरुण प्रचंड आक्रमक दिसत होता. मनोज जरांगेंनी त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. यावेळी मंचावरील इतरांनी त्याला पकडून मंचावरून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. यामुळे मंचावर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मंचावरील उपस्थित आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेलं.

“आत्महत्या करून आरक्षण मिळवायचं असेल, तर न मिळालेलं चांगलं”

हा तरुण नेमका कशामुळे आक्रमक झाला होता, त्याचं म्हणणं काय होतं, मनोज जरांगे संतापल्यानंतर नेमकं काय म्हणाले हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आयोजकांकडूनही अद्याप या प्रकारावर अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. मात्र , तरुणाला मंचावरून उचलून खाली नेल्यानंतर माईकवर बोलणाऱ्या सुत्रसंचालकाने म्हटलं, “हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. आपल्याला आत्महत्या करून आरक्षण मिळवायचं असेल, तर असं आरक्षण न मिळालेलं चांगलं.”

हेही वाचा : “मोदी-शाह-शिंदेंना वेळ नसेल, तर…”; मराठा आरक्षणावर मनोज जरांगे आक्रमक, स्पष्टच म्हणाले…

“आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली”

दरम्यान, जुन्नरमधील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “काल आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. आपल्या परिवारातील सदस्य गेला आहे. त्यामुळे आज आपल्याला हार-फुलं काहीच घ्यायचं नाही. त्याच्या जाण्याचं आपल्याला दुःख असलं पाहिजे. त्याचं स्वप्न होतं की, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.”

“सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार”

“सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. मराठा समाजाचे पोरं हट्ट करायला लागले. याला पूर्णपणे जबाबदार सरकार आहे. जगात आमच्यासाठी शिवनेरीपेक्षा मोठं आणि पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. मी आज शिवनेरी किल्ल्यावरून जाहिरपणे सांगतो की, आमच्या आत्महत्या होत आहेत याला सरकार जबाबदार आहे. त्यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil get angry after chaos on stage in rajgurunagar public rally pbs
Show comments