पिंपरी- चिंचवड : मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते धंनजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेल्या एन्काऊंटरबद्दलच्या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी बगल दिली आहे. वाल्मिक कराडची गरज राहिली नसेल म्हणून त्याला मारून टाकायचं असेल असं खळबळजनक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. वाल्मिक कराडच्या मार्फत भरपूर संपत्ती कमावली. आता गरज राहिली नसेल. माणूस राजकारणात गेला की पैशांची चटक लागते. मंत्री पद भोगायची सवय झाली आहे. लोकांना पायाखाली घेणं अवघड नाही. असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
राज्यभर सध्या बीड जिल्ह्याची मोठी चर्चा आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केलेल्या आरोपांवर राज्यभर जोरदार चर्चा आहे. कासले यांनी धंनजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करायचा होता. त्यासाठी मला सुपारी दिली होती. असा खळबळजनक आरोप रणजित कासले यांनी केला आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“२० वर्षे वाल्मिक कराडचा वापर केला. अनेकांच्या हत्या केल्या, आता मारून टाकावं असं धंनजय मुंडे यांना वाटलं असेल.” असं खळबळजनक वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. वाल्मिक कराड हा संत नाही. फाशी देऊन त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला माफ करू नये. धंनजय मुंडे हे राजकीय हेतूसाठी गुंडांच्या टोळ्या चालवतात. संतोष देशमुख हत्येतील सहआरोपी यांना देवेंद्र फडणवीस यांनी वाचवले आहे.
पुढे ते म्हणाले, धंनजय मुंडे यांना बीडचा बिहार करायचा आहे. पण, आम्ही तो होऊ देणार नाहीत. ‘त्या’ मंत्र्याने बीडला बदनाम केलं आहे. आरोग्य अधिकारी अशोक थोरात यांचं निलंबन का केल? ते मराठा असल्याने त्यांचं निलंबन केलं आहे का?. १२ जणांची चौकशी झाली मग अशोक थोरात यांचंच निलंबन केलं. अजित पवारांनी सगळ्यांना निलंबित करायला हवं. सर्वच जण दोषी आहेत. सगळ्यांना कारागृहात पाठवा. अनेकांच्या क्रूर हत्या त्या नेत्याने केल्या आहेत. समाजाची बदनामी झाल्याने अनेकजण नाराज आहेत.