पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या संग्रहातील ‘भगवद्गीता’ आणि भरतमुनींचे ‘नाट्यशास्त्र’ ही दुर्मीळ हस्तलिखिते आता जागतिक वारसा झाली आहेत. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा नोंदीमध्ये या हस्तलिखितांचा जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून समावेश झाला आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा नोंदीमध्ये समाविष्ट असलेल्या १४ दुर्मीळ गोष्टींमध्ये भांडारकर संस्थेच्या संग्रहातील पाच हस्तलिखितांचा अंतर्भाव आहे.

दोन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथाचे एक हस्तलिखित, तसेच ‘भगवद्गीते’ची काश्मिरी शारदा लिपीतील पाच हस्तलिखिते यांची विशेष नोंद ‘युनेस्को’ने घेतली आहे. ‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्र’ या हस्तलिखितांची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये नोंद झाली असल्याचे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमाद्वारे कळविले आहे. त्याचप्रमाणे ‘युनेस्को’च्या संकेतस्थळावरही त्याची नोंद करण्यात आली आहे.

भांडारकर संस्थेच्या संग्रहात असलेल्या ‘ऋग्वेदा’च्या हस्तलिखित पोथीला ‘युनेस्को’ने दोन दशकांपूर्वीच जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली होती. ‘ऋग्वेद’, ‘सहृदयालोकलोचन’ हा अभिनव गुप्ताचा काव्यशास्त्रावरील प्राचीन ग्रंथ, तसेच ‘पंचतंत्र’ या भांडारकर संस्थेतील तीन महत्त्वाच्या हस्तलिखितांचा समावेश यापूर्वी ‘युनेस्को’च्या या यादीत झालेला आहे. त्यामुळे जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या १४ गोष्टींपैकी पाच दुर्मीळ हस्तलिखिते भांडारकर संस्थेच्या संग्रहातील आहेत, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.

काय आहे हस्तलिखितांमध्ये?

जॉर्ज ब्यूह्लर या विद्वानाने १८७५-७६ या वर्षात भगवद्गीतेची तीन हस्तलिखिते काश्मीरमधून मिळवली होती. तसेच सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी १८८३-८४ या वर्षात दिल्लीहून दोन हस्तलिखिते विकत घेतलेली होती. या सर्व हस्तलिखितांचा संस्कृत भाषेमधला मजकूर शारदा लिपीत लिहिलेला असून, भगवद्गीतेवरील निरनिराळ्या प्राचीन टीका या पाच हस्तलिखितांमध्ये आढळतात. त्यामुळे हा वारसा जागतिक महत्त्वाचा असल्याचे युनेस्कोने घोषित केलेले आहे. नाट्यशास्त्राचे हस्तलिखित जॉर्ज ब्यूह्लर या विद्वानानेच १८७३-७४ या वर्षी राजस्थानातून मिळवले होते. या हस्तलिखितामध्ये एकूण २६० पृष्ठे असून, नाट्यशास्त्राच्या अत्यंत प्राचीन परंपरेचे प्रतिनिधित्व ही पोथी करते. रुपणिमिश्र हे या पोथीचे लेखनिक होते असे दिसून येते. विशेष बाब म्हणजे पानांच्या डाव्या समासांत या ग्रंथाचे नाव ‘संगीतभारती’ असे लिहिलेले आहे.

‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्र’ या दुर्मीळ हस्तलिखितांना जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी यासाठी संस्थेने ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फाॅर द आर्ट्स’ या संस्थेच्या माध्यमातून प्रस्ताव सादर केला होता. त्याची दखल घेऊन ‘युनेस्को’ने या दोन्ही हस्तलिखितांना जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. ‘युनेस्को’च्या यादीतील समावेशाकरिता कागदपत्रांच्या पूर्ततेकरिता दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील अभ्यासक डॉ. रमेशचंद्र गौर यांच्या चमूने, तसेच भांडारकर संस्थेतील डॉ. अमृता नातू आणि डॉ. श्रीनंद बापट यांनी काम केले आहे. भूपाल पटवर्धन, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष