पुणे जिल्ह्याच्या परिसरात घनदाट झाडीत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या सोनपाठी सुतार पक्ष्यांचा अधिवास वाढू लागल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. सुतार पक्ष्याच्या अनेक जाती-प्रजाती आहेत. त्यामध्ये अत्यंत देखणा सोनेरी पाठीचा, लाल तुरा, गळ्यापासून पोटाच्या भागापर्यंत काळे पांढरे ठिपके असे मनमोहक रूप असलेला सोनपाठी सुतार पक्षी नेहमीच निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करणारा ठरला आहे .
पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह
भारत, पाकिस्तान, म्यानमार या ठिकाणी आढळणारा पक्षी अन्य ठिकाणी तसा दृष्टीपथात पडत नाही. मात्र, आता जिल्ह्यात तसेच पुणे शहराच्या आजूबाजूला सिंहगड परिसर आणि घनदाट झाडीत हा मनमोहक रूपातील सोनपाठी सुतार दिसू लागल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
उजनी धरणावर मोठ्या संख्येने पाणपक्षी
पुणे जिल्हा पक्ष्यांच्या बाबतीमध्ये समृद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काळामध्ये काही पक्ष्यांचा अधिवास कमी झाल्याचे निरीक्षण पक्षी निरीक्षक नोंदवत असतानाच पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर विस्तीर्ण परिसरात उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचे अनुमान पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी व्यक्त करीत आहेत. देशोदेशीच्या सीमा पार करून उजनी धरणावर पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने आलेले पाणपक्षी हे खऱ्या अर्थाने उजनी जलाशयाचे वैभव ठरावे इतक्या मोठ्या संख्येने त्यांचा अधिवास वाढला आहे.
चिमणी आणि कावळा पक्ष्यांची संख्या कमी
परदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच स्थानिक चिमणी आणि कावळा पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचेही निरीक्षण पक्षी निरीक्षकांनी नोंदविले आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात इजिप्शियन गिधाड आढळून आल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. सुतार पक्षाच्या अनेक जाती-प्रजाती महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र, दुर्मीळ झालेला सोनपाठी सुतार पक्षी पुणे जिल्ह्यात आढळून आला असून त्यांचा अधिवास वाढू लागल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.