लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘मान्सूनचा अभ्यास, मान्सूनच्या अंदाजांमध्ये भारतात मोठी प्रगती झाली आहे. आजपर्यंतच्या अभ्यासातून मान्सूनचे विविध पैलू समजले आहेत. मात्र, आता अधिक सखोल निरीक्षणे, अंदाज वर्तवण्यात अनेक आव्हाने आहेत,’ असे मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सोमवारी मांडले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम), केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय, वर्ल्ड वेदर रीसर्च प्रोग्रॅम(डब्ल्यूडब्ल्यूआरपी) यांच्यातर्फे आयोजित मान्सून अंदाजातील प्रगती आणि त्याचे हवामान बदलावरील परिणाम या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे डॉ. महापात्रा, पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन सहभागी झाले. तर आयआयटीएमचे संचालक डॉ. आर. कृष्णन्, डब्ल्यूडब्ल्यूआरपीचे वैज्ञानिक अधिकारी डॉ. निको काल्टाबियानो, डॉ. हिंदुमती पलनीस्वामी या वेळी उपस्थित होते.

मान्सून हा भारतीय उपखंडासाठी जीवन असल्याचे सांगून डॉ. महापात्रा म्हणाले, ‘सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास नुकसान किंवा कमी पडल्यास दुष्काळ ओढावतो. भारताचे हवामान अंदाजासाठी जगभरातील संस्थांशी सहकार्य आहे. त्याचा अंदाज वर्तवण्यासाठी फायदा होत आहे. मात्र, अजूनही अंदाजांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रारूप व्यवस्थेमध्ये प्रगती करावी लागणार आहे. विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिक, धोरणकर्ते यांना होणार आहे.’

‘मोसमी काळात, दशकभरात मान्सून कसा बदलतो आहे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या स्तरांवर, विविध प्रदेशांमध्ये मान्सूनच्या अंदाजांमध्ये कशी सुधारणा करता येईल, याची चर्चा होणेही गरजेचे आहे. जागतिक स्तरावरील वातावरणीय घटकांचा विविध भागांत तीव्र घटना घडण्यावर कसा परिणाम होऊ शकतो हेही अभ्यासले पाहिजे,’ असे मत डॉ. एम. रविचंद्रन यांनी मांडले.

Story img Loader