लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे मेट्रोच्या कामाच्या संथ गतीवरून टीका होत असतानाच मेट्रो स्थानकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मेट्रो स्थानकांच्या उभारणीत अनेक त्रुटी असल्याची धक्कादायक बाब शहरातील ज्येष्ठ अभियंत्यांनी समोर आणली होती. त्यांनी याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पत्र पाठवले होते. यावर महामेट्रोनेही काही त्रुटी मान्य केल्या. दरम्यान, या अभियंत्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.
पुणे मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आनंदनगर आणि वनाज या स्थानकांच्या कामात अनेक त्रुटी असल्याची बाब समोर आली होती. स्ट्रक्चरल इंजिनिअर नारायण कोचक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सिव्हिल इंजिनिअर शिरीष खासबारदार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ.केतन गोखले, हैदराबाद मेट्रो रेलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक गाडगीळ यांनी ही बाब उघडकीस आणली. याबाबत त्यांनी महामेट्रोला पत्र पाठवले होते. या पत्रासोबत त्यांनी ५० छायाचित्रेही जोडली होती. त्यांनी प्रत्यक्ष स्थानकांनी भेटी देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना सापडलेल्या त्रुटींची ही छायाचित्रे होते.
आणखी वाचा- पुणे: दागिने घडविण्यासाठी दिलेले सव्वा कोटींचे सोने घेऊन कारागीर पसार
या पत्रावर महामेट्रोने म्हटले होते की, काही ठिकाणी कौशल्यासंबंधी त्रुटी आढळल्या आहेत. मात्र, स्थानकाची संरचना पूर्णपणे सुरक्षित आहे. अनेक ठिकाणी दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही दुरूस्तीचे कामे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) प्रमाणित करून घेतली जात आहेत.
नारायण कोचक आणि शिरीष खासबारदार यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मेट्रो स्थानकांचे सुमार दर्जाचे बांधकाम करुन सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर १७ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
आणखी वाचा- पुणे: मध्य रेल्वेची दुहेरीकरणाची गाडी सुसाट…
मेट्रोच्या कामाची सुरूवात २०१९ मध्ये झाल्यापासून आम्ही पाहणी करीत आहोत. आधीही आम्ही कामातील त्रुटी समोर आणल्या होत्या. त्यावर मेट्रोकडून कार्यवाही झालेली नव्हती. आता प्रत्यक्ष मेट्रो सुरू झाली तरी कामात त्रुटी असल्याचे आम्ही जानेवारी महिन्यात केलेल्या पाहणीत समोर आले आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी हे अतिशय धोकादायक आहे. -नारायण कोचक, स्ट्रक्चरल इंजिनिअर