नारायणगाव : शेतकऱ्यांना शेती निगडीत असलेल्या आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत कुकुटपालन, गाईगोठा यासाठी २५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज प्रकरण मंजुर करण्याचे आमिष दाखवुन जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस ठाण्यात दोन जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात शशिकांत नामदेव कुऱ्हाडे रा.आळे व भाऊसाहेब नाना बोरचटे रा. बेल्हे , ता. जुन्नर , जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय विलास पिंगट यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, शशिकांत नामदेव कुऱ्हाडे, भाऊसाहेब नाना बोरचटे यांनी२५ ऑक्टोबर २०२४ रोजी आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामध्ये कामाला असून शेतकऱ्यांना शेती निगडीत कुकुटपालन, गाईगोठा अशा योजनांसाठी शासनाच्या माध्यमातून २५ लाख रूपये कर्ज प्रकरण मंजुर करून देतो असे आमिष संजय पिंगट यांना दाखवले. हे कर्ज मंजुर करून घेण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी एकुण ४ लाख ९८ हजार ९०० रुपये घेतले. त्यानंतर भूल थापा देत कर्जप्रकरण मंजुर करणेकरीता घेतलेली एकुण रक्कम परत न करता फसवणुक केली. अशाच प्रकारे गावातील सुनिता रमेश बांगर, कविता किशोर तांबे, सारीका सचिन बोरचटे, वंदना भास्कर नरवडे, सुवर्णा ईश्वर पिंगट, कविता सुभाश बोरचटे तसेच इतर अनेक लोकांची फसवणुक केली आहे, असे पिंगट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या दोघा आरोपीने घरातच आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ योजनेचे ऑफिस थाटून जुन्नर पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांकडून मोठमोठ्या रक्कमा उकळून त्यांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
यामध्ये बेल्हे परिसरातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. यापैकी एका आरोपीविरुद्ध यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव परिसरात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.