पुणे : मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत अतिवृष्टी झाली असून, चेन्नई विमानतळही बंद करण्यात आले आहे. यामुळे पुण्याहून चेन्नईला जाणारी आणि तेथून येणारी १२ विमाने सोमवारी रद्द करण्यात आली. याचबकोबर चेन्नईला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या काही रेल्वे गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
चेन्नईतील विमानतळ बंद करण्यात आल्याने चेन्नईला जाणारी ६ विमाने आणि तेथून येणारी ६ विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. ही सर्व विमाने इंडिगो कंपनीची होती. त्यात चेन्नई – पुणे, मंगळुरू – पुणे, हैदराबाद – पुणे, नागपूर – पुणे, पुणे – बंगळुरू, पुणे – चेन्नई, पुणे – नागपूर आणि पुणे -मंगळुरू या विमानांचा समावेश आहे.
हेही वाचा >>> उजनी धरणातील मासेमारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला ‘हा’ कठोर निर्णय
मिचौंग चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे चेन्नई विमानतळ मंगळवारी सकाळपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाआहे. पावसामुळे चेन्नईतील विमान व रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. विमाने रद्द होण्यामुळे हजारो प्रवाशांच्या प्रवासाच्या योजनेवर पाणी फिरले. पुणे विमानतळ प्रशासनाकडून चेन्नईतील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. आगामी स्थितीनुसार आणखी विमाने रद्द केली जाण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने मुंबई -चेन्नई सेंट्रल ही गाडी अरक्कोनमपर्यंत चालविण्याचे जाहीर केले आहे. ती पुढे चेन्नईपर्यंत जाणार नाही. याचबरोबर चेन्नई सेंट्रल – मुंबई ही गाडी चेन्नईऐवजी अरक्कोनम येथून सुटणार आहे. हे बदल तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले असून, स्थिती सुधारल्यानंतर नेहमीप्रमाणे या गाड्या धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.