सायबर गुन्हे शाखेकडून भामटा गजाआड
गोपनीय माहिती काढून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या भामटय़ाला सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्याने खासगी गुप्तहेर संस्थेच्या नावाने जाहिरातबाजी करून अनेकांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या सागर अशोक पंडित (रा. केशवनगर, पिंपरी) याने गुप्तहेर संस्था सुरू केल्याची जाहिरातबाजी केली होती. प्रत्यक्षात अशी काही संस्था त्याने सुरू केली नव्हती. फक्त जाहिरातबाजी करून गुप्तहेर संस्थेचे कामकाज सुरू असल्याचे तो भासवत होता. जगन्नाथ चौधरी यांनी जाहिरात पाहून पंडित याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून काही माहिती मागितली होती. चौधरी यांनी ‘जस्ट डायल’ या सेवेच्या माध्यमातून पंडित याचा मोबाइल क्रमांक मिळविला होता. पंडितने चौधरी यांनी सांगितलेले काम करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये मागितले होते. त्यानंतर तडजोड करून त्याने चौधरी यांच्याकडून चार हजार रुपये घेतले. मात्र, पैसे दिल्यानंतरही पंडित याने चौधरी यांचे काम करण्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे चौधरी यांना या गुप्तहेर संस्थेबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत तक्रार नोंदविली.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तपास सुरू असताना पंडित याने गोपनीय माहिती काढून देण्याच्या आमिषाने अनेकांना फसविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्याला बुधवारी (११ एप्रिल) सायंकाळी अटक करण्यात आली. तपासाअंती गुप्तहेर संस्था ही फसवणूक असल्याचे पोलिसांना दिसून आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, शिरीष गावडे, अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, बाबासाहेब कराळे, अविनाश दरवडे यांनी ही कारवाई केली.

दिल्लीतील साथीदाराच्या मदतीने फसवणूक
खासगी गुप्तचर सेवा पुरविण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला अशोक पंडित याने दिल्लीतील साथीदाराच्या मदतीने गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाइल सेवेसंदर्भातील गोपनीय माहिती काढून देण्याच्या आमिषाने (कॉल डिटेल्स, लोकेशन, एसएमएस) या भामटय़ांनी काही जणांना मिळून सहा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

Story img Loader