नगर रस्त्यावर सुरू करण्यात आलेला बीआरटी मार्ग सध्या सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे. या मार्गावर आतापर्यंत १० ते १२ अपघात झाले आहेत. एका वृद्धाचा बळीही या अपघातात गेला आहे. बीआरटी मार्गाच्या बांधणीतील त्रुटी आणि हा मार्ग निर्दोष होण्यासाठी कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत यासह विविध मुद्यांवर ‘नागरिक चेतना मंच’ या स्वयंसेवी संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. बीआरटी मार्गावर होणाऱ्या अपघातांच्या तसेच या प्रकल्पावर होत असलेल्या टीकेच्या पाश्र्वभूमीवर संस्थेच्या चिटणीस कनीझ सुखरानी यांच्याशी ‘लोकसत्ता’ने केलेली बातचीत..
’ बीआरटीला विरोध होण्याचे नेमके कारण काय?
आमचा विरोध बीआरटी मार्गाला नाही आणि बीआरटीला आमचा विरोध कधीच नव्हता. मात्र त्याची बांधणी चुकीच्या पद्धतीने झाली आहे. या कामाताली त्रुटी दूर व्हाव्यात अशी आमची मागणी आहे. एखादी व्यवस्था उभी करतानाच ती अचूक व्हावी यासाठी प्रयत्न का होत नाही? या मार्गासाठी जे मूळ आरेखन करण्यात आले होते, त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणे गरजेचेच आहे.
’ नगर रस्ता बीआरटीमध्ये नेमक्या त्रुटी काय आहेत?
या मार्गावर पीएमपीच्या गाडय़ांबरोबरच इतरही वाहने धावत असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या मार्गावर कुठेही वाहतूक पोलीस तसेच वॉर्डन्स दिसत नाहीत. त्याचप्रमाणे हा मार्ग सलग नाही. साधारण सहाशे मीटरमध्ये चार ते पाचवेळा हा मार्ग तोडलेला आहे. त्यामुळे पीएमपी गाडय़ांच्या वेगावर नियंत्रण येते आणि तोडलल्या भागाचा उपयोग इतर वाहने तसेच पादचारी करत असल्यामुळे अपघातही होतात. मार्गावर पुरेसा प्रकाश येईल अशीही व्यवस्था नाही.
’ सातत्याने होणाऱ्या अपघातांचे कारण काय?
बीआरटी मार्गावर पीएमपीची गाडी चालवण्यासाठी चालकांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले गेलेले नाही. कारण या चालकांची भरती कंत्राटी तत्त्वावर झालेली आहे. सर्वाधिक अपघात हे पादचाऱ्यांचे झाल्याचे दिसत आहे. त्याचे कारण चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडला जातो. बीआरटीचा हा मार्ग दोन्ही बाजूंनी बंद असणे अपेक्षित आहे. मात्र याच्या दोन्ही बाजूला असलेले रेलिंग पुरेसे उंचीचे नाहीत. त्यामुळे पादचारी त्यावरून उडय़ा टाकून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी काहीवेळा दुसरा पर्यायही नसतो. मुळात हा पुणे-नगर महामार्ग आहे. त्यामुळे वाहनांचा वेग जास्त असणे साहजिक आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे पीएमपीच्या चालकाला रस्ता ओलांडणारा पादचारी पटकन दिसून येत नाही.
’ व्यवस्थेतील सुधारणांसाठी संस्थेने काय पाठपुरावा केला?
बीआरटी मार्गातील त्रुटींबाबत संस्थेकडून सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा या मार्गाचे काम सुरू झाले, तेव्हापासून संस्थेने यातील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. इमेल, पत्र अशा विविध मार्गानी याबाबत आम्ही निवेदने दिली आहेत. या मार्गाच्या उद्घाटनापूर्वीच यातील त्रुटी दूर करण्याचे निवेदन तत्कालीन महापौरांना देखील देण्यात आले होते.
’ या मार्गावर काय सुधारणा करायला हव्यात?
या मार्गावरील अपघात तर थांबले पाहिजेतच; पण त्याचवेळी ही व्यवस्थाही सुधारली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचे आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला उंच रेलिंग लावण्यात यावेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. त्यांना मनाई करणे आवश्यक आहे. या मार्गावरील आणि नगर रस्त्यावरील पादचारी मार्गावरील अतिक्रमणे हटविणेही आवश्यक आहे. बीआरटीचा मार्ग काही ठिकाणी खंडित आहे. तो अखंड झाला पाहिजे. मार्गावरील सिग्नल यंत्रणेत ताळमेळ असावा. तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. थांब्यांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच बस थांब्याजवळ आली की त्याची उद्घोषणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी पीएमपीच्या गाडय़ांमध्ये ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ बसवण्यात यावी. इतर वाहनांची या मार्गातील ये-जा तातडीने बंद व्हावी. बीआरटीचा व्यवसाय चांगला होण्यासाठी त्याचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणेही गरजेचे आहे. मार्गावरील एसटीचे अनावश्यक थांबेही बंद केले पाहिजेत. महानगरपालिका, पोलिसांचा वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग यांनी एकत्र येऊन सुधारणा केल्या पाहिजेत. या मार्गाचे सुरक्षाविषयक परीक्षण होणेही आवश्यक आहे.
मुलाखत : रसिका मुळ्ये