पुणे : उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य सर्वेक्षणात अनेक विद्यार्थ्यांना पुरेसे अन्नग्रहण होत नसल्याने थकवा येत असल्याचे, तसेच मानसिक ताणाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक चणचणीमुळे आहार कमी असल्याचे निरीक्षणही या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. पुण्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. स्टुडंट हेल्पिंग हँड आणि राष्ट्र सेवा दलातर्फे अशा ६०५ तरुण-तरुणींची प्राथमिक स्वरूपाची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात रक्त, हिमोग्लोबिन, हिमोग्राम याची चाचणी करण्यात आली. वेलफेअर फाउंडेशनचे डॉ. मंदार परांजपे यांनी चाचणीसाठी सहकार्य केले.
शेतकरी, कष्टकरी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या तरुण-तरुणींच्या प्राथमिक स्वरूपातील आरोग्य समस्या या चाचणीतून स्पष्ट झाल्या. चाचणीमध्ये १८ ते २४ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश होता. चाचणीत सहभागी मुलींपैकी ५८ टक्के मुली न्याहारी आणि रात्रीचे जेवण किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घेतात. न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण असा सर्वंकष आहार घेणाऱ्या मुली ४४ टक्के आहेत. काही मुली तर दिवसातून केवळ एकदा जेवतात. ७९ टक्के मुलींना मासिक पाळीचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तसेच पित्त, खूप भूक लागणे, कमी भूक लागणे, मूळव्याध, पीसीओडी, अर्धशिशी, डोळे दुखणे, दमा, थायरॉइड अशा आरोग्य समस्याही नोंदवल्या गेल्या. मुलींमध्ये ॲनिमियाचे प्रमाण ४१ टक्के आहे.
हेही वाचा…पिंपरी: आता तिसऱ्या डोळ्याची पिंपरी-चिंचवडवर नजर!
एकूण मुलग्यांपैकी ५८ टक्के मुलगे दोन वेळचे जेवण घेतात. त्यांच्यामध्ये जास्त भूक लागणे, कमी भूक लागणे, मधुमेह, फंगल ॲलर्जी, सतत सर्दी, त्वचारोग, हृदयरोग, पोट बिघडणे अशा आजारांची नोंद झाली. ५१ टक्के मुलांना मानसिक दडपण, अपयशाची भीती, भविष्याची चिंता वाटत असल्याचे दिसून आले. मुलांमधील ॲनिमियाचे प्रमाण २३ टक्के आहे. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या मुली ४१ टक्के, तर मुलगे २३ टक्के आढळले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सर्वेक्षण छोट्या स्वरूपाचे आहे. मात्र, त्यातूनही विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्या समोर आल्या. अपुरा, तसेच अयोग्य आहार हे त्याचे प्रमुख कारण आहे. या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळण्यासाठी शिक्षण संस्था, प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. तसेच त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही झाली पाहिजे, असे स्टुडंट हेल्पिंग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.
हेही वाचा…तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
सर्वेक्षणात ऊसतोड कामगार, अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी होते. त्यांच्या भागात चांगल्या शैक्षणिक व्यवस्था नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुण्यात येतात. हे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या गुणवत्ता असलेले आहेत. राहण्या-जेवण्याची व्यवस्था चांगली नसल्याने त्यांचे शारीरिक, मानसिक कुुपोषण होते. या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरल्यास ते आवरणे कठीण आहे. हे सर्वेक्षण हिमनगाचे टोक आहे. त्यामुळे अधिक सखोल अभ्यास करण्यात येत आहे, असे राष्ट्रसेवा दलाचे विश्वस्त प्रमोद मुजुमदार यांनी नमूद केले.