भक्ती बिसुरे
आपल्या निराशेला समाज माध्यमांवर वाट करून देत आत्महत्येचा पर्याय जवळ करणाऱ्या व्यक्तींची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात समोर येत आहेत. मोबाइलवरच्या जीवघेण्या खेळांमधील थरार न सोसल्याने जीवाची किंमत मोजणारे देखील कमी नाहीत. या पार्श्वभूमीवर गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेले ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेचे काम काळाची गरज ठरत आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून त्यांना परावृत्त करण्याचे काम कनेक्टिंग संस्थेचे स्वयंसेवक करत आहेत.
अर्नवाज दमानिया यांच्या पुढाकारातून २००५ मध्ये ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. प्राथमिक टप्प्यावर जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्याने या स्वरूपात संस्थेचे काम सुरू होते. २००९ पासून संस्थेने हेल्पलाइन क्रमांक सुरू करून आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्तींना संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ईमेलद्वारे देखील अनेक व्यक्ती आपल्या नैराश्याला वाट मोकळी करून देतात. हेल्पलाइन क्रमांकाच्या मदतीने दररोज दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत गरजू व्यक्तींशी संवाद साधला जातो. या क्रमांकावर संपर्क करणाऱ्या व्यक्तींना त्यांची ओळख विचारली जात नाही. शंभरहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ही समस्या निवारणाचे काम केले जाते. आतापर्यंत पंचवीस हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी आत्महत्या करावीशी वाटते म्हणून कनेक्टिंगशी संपर्क केला आहे.
गेली बारा वर्षे कनेक्टिंगचे स्वयंसेवक असलेले वीरेन राजपूत म्हणाले, कनेक्टिंगच्या हेल्पलाइन क्रमांकावर पंधरा ते एकोणतीस वर्षे वयाच्या मुलामुलींचे सर्वाधिक दूरध्वनी येतात. काही प्रमाणात ज्येष्ठ नागरिकदेखील संपर्क करतात. अशा व्यक्तींनी संपर्क केल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे हेच आमचे धोरण असते. त्यासाठी आम्ही येणाऱ्या स्वयंसेवकांना देखील समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेण्याचे प्रशिक्षण देतो. केवळ ऐकून घेण्यातून देखील अनेक व्यक्ती आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होतात, तसे पुन्हा संपर्क साधून कळवतात देखील.
स्वयंसेवक हवेत
कनेक्टिंग या स्वयंसेवी संस्थेत येणाऱ्या व्यक्तींचे ऐकून घेण्यासाठी, दूरध्वनीद्वारे संपर्क करणाऱ्या व्यक्तींशी बोलण्यासाठी स्वयंसेवकांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे. स्वयंसेवक होण्यास इच्छुक व्यक्तीला सत्तर तासांचे प्रशिक्षण दिले जाते, आठवडय़ातील चार तासांचा वेळ या स्वयंसेवकांनी कामासाठी द्यावा ही अपेक्षा असते.
संपर्क कोठे साधावा?
१८००-८४३-४३५३ किंवा ९९२२००११२२ या क्रमांकावर दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधून गरजू व्यक्ती आपले मन मोकळे करू शकतात. connectingngo@gmail.com या क्रमांकावर ईमेल पाठवू शकतात.