पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून तुमच्या कामावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, आताचे पालकमंत्री खूप वेळ देतात. सहजपणे लोकांना उपलब्ध होतात. ते सर्वांचं ऐकून घेतात. लोकांच्या अंगावर जात नाही. ते सर्व सामान्य लोकांमधील असून त्यांना त्यांच्या बद्दल प्रेम वाटतं. त्यांचे २४ कारखाने नाहीत. हे सर्वसामान्य माणसाला वाटत असल्याचं त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “आज…”
तसेच ते पुढे म्हणाले की, स्वत:वर अनेक वेळा झालेला अन्याय अजित पवारांना शब्दबद्ध करता येत नाही. ते सांकेतिक भाषेत बोलत राहतात. त्यामुळे अजित पवार आपल्यावर काय काय अन्याय झाला आहे ते पत्रकार परिषद घेऊन सांगावं, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सत्यजित तांबेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही
सत्यजित तांबे यांचा भाजपात प्रवेश होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांचा भाजपात प्रवेश होईल का त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. आता पुढे काय करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. सत्यजित तांबे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही.