पुणे: पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर ते खडकी स्थानकांदरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीचे काम केले जाणार आहे. या कामासाठी शनिवारी (ता.२५) आणि रविवारी (ता.२६) ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे हे दोन दिवस अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्या विलंबाने धावणार आहे. या कामामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या प्रवाशांनी सर्वाधिक फटका बसणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुटणाऱ्या मुंबई – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि मुंबई- पुणे सिंहगड एक्सप्रेस रद्द राहील. रविवारी पुणे- तळेगाव -लोणावला -पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व ४६ लोकल गाड्या रद्द राहतील. तसेच, रविवारी सुटणाऱ्या पुणे – मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे – मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे – मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई – कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस या गाड्या रद्द राहील.
हेही वाचा… शिक्षणात अनोखा प्रयोग! अभियांत्रिकीचे विद्यार्थी गिरवणार अर्थशास्त्राचे धडे
याचबरोबर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामध्ये शनिवार त्रिवेंद्रम येथून सुटणारी त्रिवेंद्रम – मुंबई एक्सप्रेस, ग्वाल्हेर येथून सुटणारी ग्वाल्हेर – दौंड एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पुण्यातून सुटणाऱ्या पुणे – जयपूर एक्सप्रेस, पुणे – मुंबई एक्सप्रेस, पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस, दौंडमधून सुटणारी दौंड – इंदौर एक्सप्रेस या गाड्याही विलंबाने सुटतील.
तसेच, काही गाडी थोड्या उशिरा धावणार आहेत. त्यात शनिवारी धावणाऱ्या बंगळुरु – मुंबई उद्यान एक्सप्रेस, बंगळुरु – गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवारी धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- चेन्नई एक्सप्रेस , लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.