पुणे : अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एका नकाशावर आणण्याची किमया भूगोलतज्ज्ञ डाॅ. सुरेश गरसोळे यांनी साधली आहे. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे भूगोल दिनानिमित्त देशातील प्रमुख श्रीराम मंदिरांचा नकाशा समाजार्पण करण्यात आला.
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधून हा नकाशा खास तयार करण्यात आला आहे. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिर, रामटेक येथील श्रीराम मंदिर त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर येथील रघुनाथ मंदिर, मध्य प्रदेशातील ओरछा येथील राम राजा मंदिर, कर्नाटकातील चिकमंगळूर येथील कोदंड राम मंदिर, केरळ येथील त्रिशूरमधील त्रिपायर श्रीराम मंदिर, आंध्र प्रदेशच्या हैदराबाद येथील सीता रामचंद्र स्वामी मंदिर, ओरिसा येथील भुवनेश्वर राम मंदिर या निवडक श्रीराम मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुण्याच्या दोन्ही दादांची महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ
शतायुषी भूगोलमित्र आणि ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांच्या हस्ते या नकाशाबरोबरच भूगोल संदेश देणाऱ्या टी शर्टचे अनावरण करण्यात आले. डाॅ. सुरेश गरसोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नकाशानिर्मितीची प्रक्रिया उलगडली. प्रा. मुक्ता कुलकर्णी, अमृत गरसोळे, अभिनेत्री गात या वेळी उपस्थित होते.