पुणे : पुण्यात सेमीकंडक्टर उत्पादनासह इतर नावीन्यपूर्ण क्षेत्रांना गती देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (एसटीपीआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात सहकार्यावर दोन्ही संस्थांकडून भर दिला जाणार आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी एसटीपीआय महाराष्ट्रचे संचालक अजय श्रीवास्तव, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबने आणि एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना एस. कृष्णन म्हणाले की, सेमीकंडक्टर आयातीवर भारताला अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे आपल्याला सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात मोठे उत्पादन प्रकल्प उभारून परिसंस्था निर्माण करावी लागेत. त्यात कच्चा माल, पुरवठा साखळी आणि अचूक उत्पादन क्षमता या बाबींवर भर द्यावा लागेल. पुढील दशकात भारतीय कंपन्यांनी रचना केलेल्या सेमीकंडक्टर चीप अतिशय महत्त्वाच्या ठरतील. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी परिसंस्था निर्माण करण्यात पुणे मोठी भूमिका बजावेल.
हेही वाचा : शहरबात: तोतया डाॅक्टरांना रोखणार कोण?
एमसीसीआयए आणि एसटीपीआय यांच्याकडून सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यासाठी पावले उचलली जातील. त्यात प्रामुख्याने सेमीकंडक्टरचे उत्पादन, रचना आणि संशोधन या बाबी महत्त्वाच्या ठरतील. यातून पुण्यातील इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राला आणखी गती मिळेल, असे एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा : मोहरमनिमित्त पुण्याच्या मध्यभागातील वाहतुकीत आज बदल
पुणे हे देशातील आघाडीचे उत्पादन, माहिती तंत्रज्ञान व सेवा उद्योग केंद्र आहे. देशाच्या विकासात पुणे भरीव योगदान देत आहे. भविष्यात पुणे सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रातही आघाडीवर राहील.
प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए