पिंपरी : राज्य शासनाने जारी केलेल्या मसुद्याचे सगेसोयऱ्यांच्या व्याखेसह कायद्यात रूपांतर न करता मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. या फसवणुकीच्या निषेधार्थ लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती आणि पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करणार असल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या मंत्र्यांना घेराव घालण्याचाही निर्णय घेण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक चिंचवडगावातील भोईर व्यायामशाळा येथे पार पडली. सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना नवी मुंबईत आंदोलन स्थगित करायला लावले. अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दि. १६ फेब्रुवारीपर्यंत यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झाले. तरी महाराष्ट्र शासनाने सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर केले नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा >>>पूर्वप्राथमिक, पहिलीच्या प्रवेशासाठी नेमके वय किती? शिक्षण विभागाने दिली माहिती…
शासनाने जरांगे-पाटील यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केली आहे. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकसभेच्या मावळ, शिरूर, बारामती आणि पुणे मतदारसंघात हजारो उमेदवार उभे करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी येत्या चार दिवसांत या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात व पुणे जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांना घेराव घालून जाब विचारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
लोकसभेसाठी ग्रामीण भागातील प्रत्येक गावातून एक, शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून किमान दोन उमेदवार उभे करण्याचे या वेळी ठरवण्यात आले. ज्यांना उमेदवारीअर्ज भरण्याची इच्छा आहे. त्यांनी शिरूर लोकसभेसाठी मनोहर वाडेकर, आतिश मांजरे, जीवन बोराडे, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मारुती भापकर, प्रकाश जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. दरम्यान, मराठा समाजाने मोठ्या संख्येने उमेदवार उभे केल्यास मतदान यंत्राची कमतरता भासू शकते.शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले.